सावंतवाडी : येथील श्री साई वात्सल्य पंचमस्थान, भवानी चौक येथे श्री साईबाबांच्या मंदिरात सोळाव्या वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सकाळी सात वाजता श्री साईंची पूजा अभिषेक व आरती तसेच दुपारी एक ते तीन या कालावधीत महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.





सायंकाळी सहा वाजता माजगाव येथील ओंकार महापुरुष भजन मंडळाच्या सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. तर रात्री आठ वाजता श्री कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ, नेरुर यांचा ‘कर्मप्रकोप’ हा दणदणीत पारंपरिक दशावतारी नाट्यप्रयोग संपन्न झाला.

तसेच रात्री सावंतवाडी येथील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंतांचा सन्मान मुंबई येथील ज्येष्ठ शिवसैनिक दत्ता घाटकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यात नगरसेवक देव्या सूर्याजी, सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून गोरगरिबांची सेवा देणारे सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव, समीरा खलील, श्री कदम, कवयित्री स्नेहा कदम तसेच कॅरम व बुद्धिबळ खेळात राज्य व राष्ट्रीय स्तरावर नैपुण्य मिळविलेल्या साक्षी रामदुरकर यांचा सन्मान करण्यात आला. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन श्री साईभक्त मंडळातर्फे करण्यात आले.
दरम्यान दरवर्षी अशाच पद्धतीने कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे साईभक्त जावेद शेख, दानिश शेख, वाय. पी. नाईक, नगरसेवक देव्या सूर्याजी, प्राध्यापक रुपेश पाटील, युवा पत्रकार विनायक गावस, श्री. नेवगी तसेच अन्य साई भक्तांनी सांगितले.






