सावंतवाडी : कबुलायतदार गांवकर जमीन प्रश्नाचा हा लढा गेली अनेक वर्षे सुरू होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंबोली, चौकुळ, गेळे वाटपाच्या जीआरवर सही केली. मात्र, नंतरच्या ठाकरे सरकारने याला स्थगिती देण्याच काम केलं. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिलं कोणतं काम केलं तर ही स्थगिती उठवली. महायुती सरकारनं हा निर्णय घेऊन जमीन वाटपाचा निर्णय घेतला. वनाची एन्ट्री पंधरा दिवसांत काढलेलं महाराष्ट्रातील एकमेव उदाहरण आहे असं मत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले. सावंतवाडी येथील जमीन कागदपत्रे वाटपाच्या आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
ते म्हणाले, वन खात्याची ३५ सेक्शनची एन्ट्री तिनही गावच्या सातबारांवर रहाणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून सावंतवाडी मतदारसंघाचा विकास होताना आंबोली, चौकुळ व गेळे ही प्रमुख केंद्रस्थानी असतील असं मत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले. तसेच पर्यटनदृष्ट्या या ठिकाणी चांगले प्रकल्प राबविण्यासाठी सरकारने योजना आखली आहे. याचा निश्चितच पर्यटनाला लाभ होईल. आमचं महायुतीचे सरकार आहे. विविध योजना राज्यात सुरू आहेत. या गावांचा विकास होत असताना हा विकास चिरकाल टिकणारा असायला हवा हा आमचा आग्रह आहे. मात्र, या गावांचा विकास होत असताना निसर्गसौंदर्याने नटलेली ही गावे काँक्रीटची जंगलं होऊ नयेत याची काळजी घ्यायला हवी असे आवाहन देखील मंत्री केसरकर यांनी यावेळी केले.