सावंतवाडी : शहरात ग्रामीण भागातून आंबे विक्रीसाठी येणाऱ्या महिलांवर होणाऱ्या कारवाई विरोधात आता आवाज उठू लागला आहे. माजी नगरसेवक विलास जाधव यांनी नगरपरिषद प्रशासनाकडे लक्ष वेधत या महिलांना
हुसकावून.लावण्याऐवजी त्यांच्यासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. ग्रामीण भागातील अनेक महिला आपल्या कष्टाने पिकवलेले आंबे घेऊन दरवर्षी हंगामी स्वरूपात सावंतवाडी बाजारपेठेत विक्रीसाठी येतात. या दोन महिन्यांच्या कालावधीतच त्यांची मोठ्या प्रमाणावर उपजीविका अवलंबून असते. मात्र, जागेअभावी त्या उपलब्ध होईल त्या ठिकाणी बसून विक्री करत असताना नगरपरिषदेच्या कारवाईला सामोरे जावे लागत आहे.
अवकाळी पावसामुळे आधीच नुकसान सहन केलेल्या शेतकरी आणि महिला विक्रेत्यांना दिलासा देण्याऐवजी त्यांच्यावर कारवाई करणे अन्यायकारक असल्याची भूमिका विलास जाधव यांनी मांडली आहे. त्याऐवजी आठवडा बाजाराच्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात दोन महिन्यांसाठी स्वतंत्र “आंबा बाजारपेठ” उभारून या महिलांना अधिकृतपणे बसण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
या मागणीचा सकारात्मक विचार करून नगराध्यक्ष सौ. श्रद्धाराजे भोसले आणि सावंतवाडी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी तातडीने निर्णय घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.



