सिंधुदुर्गनगरी : सिंधूरत्न योजनेमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी संदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्याकडे उबाठा सेनेतर्फे निवेदन देण्यात आले.
सिंधूरत्न योजनेअंतर्गत विद्युत ट्रान्सफॉर्मरसाठी वीज वितरण मार्फत खर्च करण्यात आलेल्या सर्व कामांची चौकशी करणेबाबत निवेदन दिले. यावेळी सदर योजनेची कसून चौकशी व्हावी, अशी विनंती शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, वेंगुर्ला तालुकाप्रमुख यशवंत परब, माजी जिल्हाप्रमुख रमेश गावकर इतर उबाठा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
या निवेदनात उबाठा सेना पदाधिकारी म्हणतात की,
सिंधुरत्न योजने अंतर्गत सिंधुरत्न योजनेचे अध्यक्ष शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी वैयक्तिकरित्या अनेक ठिकाणी सिंधुरत्न योजनेचा निधी मनमानीपणे वापरल्याबाबत सर्वत्र चर्चा असून श्री. राजन तेली यांनी दैनिक पुढारी रविवार दि. 06 ऑक्टोबर 2024 मधून सिंधुरत्न योजनेतून दिलेल्या निधीची चौकशी करण्याची मागणी केलेली आहे.
या पत्राद्वारे आम्ही आपणांस विनंती करतो की, सिंधुरत्न योजनेच्या निधी ज्या ज्या कामांसाठी खर्च झालेला आहे. त्या सर्व निधीच्या वापराची चौकशी करण्यात यावी. विशेषकरुन सिंधुरत्न योजनेच्या निधीतून करण्यात आलेली विद्युत ट्रान्सफॉर्मरच्या कामांची चौकशी होणे आवश्यक आहे.
तसेच सिंधुरत्न योजनेच्या निधीचा वापर करताना मंजूर करण्यात आलेल्या कामांचे निकष तपासून पाहणे आवश्यक आहे. कारण काही निधी सर्वसामान्यांसाठी खर्च न होता, वैयक्तिक व व्यावसायिक लोकांसाठीच विद्युत ट्रान्सफॉर्मर मंजूर करुन व्यावसायिकांसोबतचे वैयक्तिक संबंध जपण्यासाठी सिंधुरत्न योजनेचा गैरवापर करण्यात आला असल्याचे निदर्शनास येत आहे.
तरी वरील प्रकरणी सखोल चौकशी करुन त्याबाबत योग्य ती माहिती आम्हांला कळविण्यात यावी, अशी विनंती शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, वेंगुर्ला तालुकाप्रमुख यशवंत परब, माजी जिल्हाप्रमुख रमेश गावकर इतर उबाठा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.