सावंतवाडी : आरोंदा येथील प्रस्तावित हद्दपार इसम सोनू उर्फ अमित दिवाकर निवजेकर (वय ३१) यास दोन वर्षांसाठी कोल्हापूर, सिंधुदुर्ग व रत्नागिरी या तीन जिल्ह्यांच्या हद्दीतून तडीपार करण्याचा प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी, सावंतवाडी यांनी मंजूर केला आहे. त्यानुसार संबंधित आदेश प्राप्त झाल्यानंतर पोलिसांकडून त्याची अंमलबजावणी करण्यात आली.
पोलिसांनी निवजेकर यास आदेशाची बजावणी करून दोन पोलीस अंमलदारांच्या ताब्यात गोवा राज्यातील त्याच्या नियोजित वास्तव्याच्या ठिकाणी सोडले. तसेच तेथील स्थानिक पोलीस ठाण्यात हजर करून तडीपार आदेशाची औपचारिक नोंद करण्यात आली.
दरम्यान, संबंधित आरोपीवर मारामारीचे सहा गुन्हे दाखल असून, याशिवाय इतर प्रतिबंधात्मक कारवाई (एनसी) देखील नोंदवण्यात आल्या होत्या. स्थानिक कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.



