सिंधुदुर्ग : निसर्गसंपन्न किनारपट्टी, सुपीक जमीन आणि मेहनती शेतकरी यांच्या बळावर ओळखला जाणारा सिंधुदुर्ग जिल्हा आता विकासाच्या नव्या पर्वाकडे झेपावताना दिसत आहे. विशेषतः फलोत्पादन क्षेत्रात सुरू असलेल्या विविध योजनांमुळे जिल्ह्यातील शेती अधिक सक्षम, आधुनिक आणि उत्पन्नवाढीच्या दिशेने वाटचाल करत आहे.
फलोत्पादन क्षेत्राची सर्वांगीण वाढ, उत्पादनक्षमतेत वाढ आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाने जिल्ह्यात सकारात्मक परिवर्तन घडवून आणले आहे. या अभियानाअंतर्गत आजपर्यंत तब्बल ३३२ लाभार्थ्यांनी विविध योजनांचा लाभ घेतला असून, सुमारे ७ कोटी २३ लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य वितरित करण्यात आले आहे. या सहाय्यामुळे फळबागांची लागवड, सिंचन सुविधा, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि उत्पादनाची गुणवत्ता वाढविणे शक्य झाले आहे.
आंबा, काजू, नारळ, सुपारी यांसारख्या पारंपरिक पिकांसोबतच नव्या फळपिकांकडेही शेतकरी वळताना दिसत आहेत. शासनाच्या योजनांमुळे केवळ आर्थिक मदतच नव्हे, तर तांत्रिक मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि बाजारपेठेची उपलब्धता यामुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. परिणामी, ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी मिळत असून शेती हा व्यवसाय अधिक फायदेशीर ठरत आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने आणि राज्य शासनाच्या कर्तव्यदक्ष धोरणांमुळे या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे. प्रशासन आणि कार्यकर्त्यांच्या समन्वयातून योजनांचा लाभ खऱ्या अर्थाने शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत असल्याचे चित्र दिसून येत आहे.



