भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळातर्फे भव्य गौरव सोहळा व गुणवंत विद्यार्थी सन्मान समारंभ उत्साहात संपन्न.

वेंगुर्ला:  भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ, वेंगुर्ला यांच्या वतीने आयोजित “भंडारी गौरव सोहळा व गुणवंत विद्यार्थी सन्मान समारंभ – २०२६” उत्साहपूर्ण वातावरणात आणि मोठ्या दिमाखात संपन्न झाला. साई दरबार हॉल, वेंगुर्ला येथे झालेल्या या कार्यक्रमात भंडारी समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला, तसेच इयत्ता ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा तसेच दहावी व बारावी बोर्ड परीक्षेत विशेष यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळाचे अध्यक्ष,माजी प्राचार्य डॉ. आनंद बांदेकर होते. कार्यक्रमाचे उद्घाटन महादेव (भाऊ) बाबू आंदुर्लेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर पंचायत समिती सभापती शंकर घारे, पंचायत समिती सदस्या शीतल राऊत व साक्षी नार्वेकर, नगरसेवक प्रणव वायंगणकर, नगरसेविका लीना म्हापणकर, गजानन गोलतकर, डॉ. गोविंद धुरी, श्रेया मयेकर, सुरेश बोवलेकर, जयराम वायंगणकर, रमेश नार्वेकर, विकास वैद्य, सदानंद केरकर, दीपक कोचरेकर, श्रेया मांजरेकर, राजेंद्र कांबळी, भरत आवळे, गुरुनाथ कांबळी, आत्माराम सोकटे, गोपाळ अणसूरकर आणि बाळू फटनाईक यांच्यासह समाजातील अनेक ज्येष्ठ व मान्यवर व्यक्ती उपस्थित होत्या.

(दीपप्रज्वलन करून उद्घाटन करताना भाऊ आंदुर्लेकर व  अन्य मान्यवर.)

(पंचायत समिती सभापती शंकर घारे यांचा सन्मान करताना भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळाचे अध्यक्ष डॉ आनंद बांदेकर, सोबत उद्घाटक भाऊ आंदुर्लेकर अणि अन्य मान्यवर.)

समाजातील शिक्षण, कला,उद्योग, समाजसेवा, संशोधन, विधी, प्रशासन आणि सार्वजनिक जीवनात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा यावेळी मानपत्र, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये महादेव (भाऊ) बाबू आंदुर्लेकर, रमेश पुंडलिक नार्वेकर, डॉ. सचिन वासुदेव परुळकर, डॉ. गोविंद प्रकाश धुरी, शैलजा सचिन परुळकर, प्रा. शिवानी रोकडे, ॲड. उत्कर्षा नारायण गोडकर, ॲड. नेहा आनंद बांदेकर, सी.ए. जान्हवी महेश अणसूरकर, विवेक रविंद्र तिरोडकर, रामा वासुदेव पोळजी, विश्वनाथ कांबळी,श्रावणी राजन अरावंदेकर आणि ऋग्वेद गोडकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी भंडारी समाजाचे प्रतिनिधित्व करीत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेल्या मान्यवरांचाही विशेष सन्मान करण्यात आला. यामध्ये पंचायत समिती सभापती शंकर घारे, पंचायत समिती सदस्या शीतल राऊत व साक्षी नार्वेकर, नगरसेवक प्रणव वायंगणकर आणि नगरसेविका लीना म्हापणकर यांचा मानपत्र, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. समाजाच्या प्रगतीसाठी आणि जनतेच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी त्यांनी केलेल्या कार्याचा यावेळी गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला.
अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. आनंद बांदेकर यांनी समाजाच्या प्रगतीचा पाया शिक्षणात असल्याचे सांगत विद्यार्थ्यांनी केवळ गुणांच्या मागे न धावता ज्ञान, संस्कार आणि सामाजिक जबाबदारी यांचेही भान ठेवावे, असे आवाहन केले. भंडारी समाजातील विद्यार्थी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करत असून समाजाने अशा गुणवंतांना सातत्याने प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. शिक्षणामुळेच व्यक्ती, समाज आणि राष्ट्राची उन्नती शक्य असल्याचे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना उच्च ध्येय निश्चित करून चिकाटीने प्रयत्न करण्याचा संदेश दिला.
उद्घाटक महादेव (भाऊ) बाबू आंदुर्लेकर यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना एमपीएससी, यूपीएससी तसेच विविध स्पर्धा परीक्षांकडे करिअरची सुवर्णसंधी म्हणून पाहण्याचे आवाहन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता असून योग्य नियोजन, सातत्यपूर्ण अभ्यास आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर प्रशासकीय सेवांमध्ये यश मिळविता येते, असे त्यांनी सांगितले. समाजातील युवकांनी शासन व्यवस्थेत आपले प्रतिनिधित्व निर्माण करण्यासाठी स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून पुढे यावे, असे आवाहन करत त्यांनी विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्यास आणि ती पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करण्यास प्रेरित केले.
पंचायत समिती सभापती शंकर घारे यांनी आपल्या मनोगतात भंडारी समाजातील विद्यार्थी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करत असल्याचा अभिमान व्यक्त केला. शिक्षण हेच यशाचे सर्वात प्रभावी साधन असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी उपलब्ध संधींचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले. समाजातील गुणवंत विद्यार्थी आणि विविध क्षेत्रांत कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करणे ही अत्यंत स्वागतार्ह बाब असल्याचे नमूद करून अशा उपक्रमांमुळे नव्या पिढीला प्रेरणा मिळते, असे त्यांनी सांगितले. शिक्षण, स्पर्धा परीक्षा, कौशल्य विकास आणि सामाजिक जाणीव यांच्या माध्यमातून युवकांनी समाजाच्या प्रगतीत सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
खजिनदार सुरेश बोवलेकर यांनी भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळाच्या कार्याचा आढावा घेत व्यासायिक शिक्षण घ्या, नोकरी देणारे बना असे आवाहन केले.
याशिवाय इयत्ता ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा तसेच दहावी व बारावी बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना भेटवस्तू आणि प्रमाणपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले. समाजातील यशस्वी व्यक्तींच्या कर्तृत्वातून प्रेरणा घेत युवकांनी मोठी स्वप्ने पाहावीत आणि सातत्यपूर्ण परिश्रमांच्या बळावर ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमास भंडारी समाजातील ज्येष्ठ नागरिक, समाजबांधव, पालक, विद्यार्थी, शिक्षक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक डॉ. सचिन परुळकर यांनी तर आभार सचिव डॉ. गोविंद धुरी यांनी मानले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles