मी गटारात दगड टाकून घाण उडवून घेत नाही! – रामदास कदमांना सुनील तटकरेंचा जोरदार टोला. ; मंडणगड नळपाणी योजनेच्या श्रेयावरून वाद. 

रत्नागिरी : खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत शिवसेना नेते तथा माजी मंत्री रामदास कदम यांच्या टीकेला अप्रत्यक्षपणे प्रत्युत्तर देताना, “रामदास कदम हे ज्येष्ठ आणि मोठे नेते आहेत. त्यांनी माझी आठवण का काढली हे मला माहीत नाही. माझा स्वभाव आहे, गटारात दगड टाकून घाण उडवून घेत नाही. त्यामुळे मला या विषयावर अधिक बोलायचे नाही,” असा टोला लगावला.

मंडणगड नळपाणी योजनेच्या श्रेयावरून सुरू असलेल्या वादाबाबत विचारले असता तटकरे म्हणाले, “मी त्या योजनेचे श्रेय घेतलेले नाही. मी त्या कामासाठी केलेले प्रयत्न सांगितले. दुसऱ्यांचे महत्त्व कमी करण्याचा माझा हेतू नव्हता. मला कुणावर टीका करण्याची सवय नाही.”

ते पुढे म्हणाले, “मी सरळपणे बोलल्यानंतर काही जण उगाच अंगावर का ओढून घेतात, हे मला समजत नाही. कोणी कितीही गलिच्छ बोलले किंवा टीका केली तरी मला त्याचा फरक पडत नाही. राजकारणात जनतेने मला उचलून धरले आहे. आपल्याला वाहिलेली लाखोलीही फुले समजली, तर मनावर काही परिणाम होत नाही.”

भास्कर जाधव यांनी ‘दिशा’ समितीच्या बैठकीबाबत व्यक्त केलेल्या नाराजीवर तटकरे यांनी सांगितले की, बैठकीचे निमंत्रण त्यांच्यापर्यंत पोहोचले होते. दिशा समितीची बैठक लांबल्याने रस्ता सुरक्षा समितीची बैठक उशिरा सुरू झाली. त्यांना बैठकीची लिंक देण्यात आली होती; मात्र नेटवर्कच्या अडचणीमुळे त्यांना सुरुवातीला ऐकू येत नव्हते. त्यांचे समाधान झाल्यानंतरच पुढील कामकाज सुरू करण्यात आले.

‘दिशा’ समितीच्या बैठकीबाबत बोलताना तटकरे यांनी अधिकाऱ्यांना वेळेचे काटेकोर पालन करण्याचा इशारा दिला. “यापुढे अधिकारी वेळेत उपस्थित राहिले नाहीत, तर कारवाई केली जाईल. पुढील बैठकीत सकाळी अकरा वाजता सभागृहाचे दरवाजे बंद केले जातील,” असे त्यांनी स्पष्ट केले.

सुषमा अंधारे यांच्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार देत, “मला कुणालाही उत्तर द्यायचे नाही. मी, अनिकेत आणि आदिती हे लोकशाही मार्गाने जनतेतून निवडून आलो आहोत. जनतेचा दीर्घकाळ पाठिंबा आम्हाला का मिळतो, याचा विचार टीकाकारांनी करावा,” असे सांगितले.

मोफत साडी योजनेबाबतच्या निर्णयाची माहिती नसल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले. प्रफुल्ल पटेल यांच्या कथित नाराजीबाबत विचारले असता त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराचा विषय अद्याप नसल्याचे सांगितले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमधील विलीनीकरणाच्या चर्चांनाही त्यांनी पूर्णविराम देत, सध्या अशा कोणत्याही चर्चा सुरू नसल्याचे स्पष्ट केले.

जिल्हा नियोजन समितीअंतर्गत मंजूर झालेली कामे अद्याप सुरू न झाल्याबद्दल त्यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तीव्र नाराजी व्यक्त केली असून, ती कामे तातडीने सुरू करण्याच्या सूचना दिल्याचेही त्यांनी सांगितले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles