रक्तदानातून जीवदान, वृक्षदानातून पर्यावरण संवर्धन! ; बांदा येथे आज भव्य रक्तदान शिबिर; रक्तदात्यांसह शेतकऱ्यांना मोफत काजू-सुपारी कलमांचे वाटप.

बांदा : सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संगम घडवून आणत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, विठ्ठल मंदिर, बांदा (बांद्याचा बाप्पा) यांच्या वतीने मंडळाच्या सातव्या वर्धापनदिनानिमित्त रविवार, दि. १९ जुलै २०२६ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, बांदा यांच्या सहकार्याने होणाऱ्या या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान‘ या संदेशाला कृतीची जोड देत गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, हा या शिबिरामागील प्रमुख उद्देश आहे. रक्ताच्या कमतरतेमुळे कोणाचाही जीव धोक्यात येऊ नये, या सामाजिक जाणीवेतून हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गेल्या सात वर्षांत विविध समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून वेगळी ओळख निर्माण केली आहे. यंदाही रक्तदानासोबत पर्यावरण संवर्धन आणि कृषी विकासाचा संदेश देत शेतकरी बांधवांसाठी मोफत काजू व सुपारी कलमांचे वितरण करण्यात येणार आहे. ‘झाडे लावा, झाडे जगवा‘ हा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी या उपक्रमाची जोड देण्यात आली असून, पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे.

रक्तदान शिबिरात सहभागी होणाऱ्या रक्तदात्यांसह शेतकरी बांधवांना या मोफत कलम वितरणाचा लाभ घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे आरोग्य, पर्यावरण आणि शेती या तिन्ही क्षेत्रांना स्पर्श करणारा हा उपक्रम ठरणार आहे.

बांदा शहरासह पंचक्रोशीतील नागरिक, युवक, महिला आणि शेतकरी बांधवांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून रक्तदानासारख्या महान कार्यात योगदान द्यावे, तसेच मोफत काजू-सुपारी कलम वितरण योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, विठ्ठल मंदिर, बांदा (बांद्याचा बाप्पा) यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles