पत्रकार सागर चव्हाण यांच्यावरील गुन्हे मागे घ्या! ; अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांना निवेदन, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संरक्षणाची मागणी.

सिंधुदुर्गनगरी : सावंतवाडी येथील ज्येष्ठ पत्रकार सागर चव्हाण यांच्यावर महावितरण विभागाकडून दाखल करण्यात आलेले गुन्हे तातडीने मागे घेऊन संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी अखिल भारतीय संपादक डिजिटल मीडिया संघटना, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्या वतीने करण्यात आली. यासंदर्भात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांना निवेदन सादर करण्यात आले.

संघटनेच्या निवेदनात म्हटले आहे की, पत्रकार सागर चव्हाण यांच्यावरील कारवाई ही केवळ एका व्यक्तीपुरती मर्यादित नसून, पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर आणि अभिव्यक्तीच्या मूलभूत अधिकारावर झालेला गंभीर आघात आहे. जनतेच्या समस्या, प्रशासनातील त्रुटी आणि विविध गैरप्रकार निर्भीडपणे समोर आणणाऱ्या पत्रकारांवर गुन्हे दाखल होणे ही लोकशाहीसाठी चिंताजनक बाब असल्याचे संघटनेने नमूद केले.

या प्रकरणाची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करून सागर चव्हाण यांच्यावरील गुन्हे तातडीने मागे घेण्यासाठी प्रशासनाने आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली.

यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांवर अन्यायकारक पद्धतीने कारवाई करण्याचे प्रकार यापुढे सहन केले जाणार नसल्याचा इशारा दिला. पत्रकारितेच्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी आवश्यक असल्यास लोकशाही मार्गाने व्यापक आंदोलन छेडण्यात येईल, तसेच सत्य मांडणाऱ्या पत्रकारांचा आवाज दडपण्याचा कोणताही प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही, अशी ठाम भूमिका संघटनेने व्यक्त केली.

यावेळी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना, सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष भरत केसरकर, कोकण संघटक राजेश नाईक, विनायक गावस, चिन्मय घोगळे, निलेश ओरोसकर, वैष्णवी ओरोसकर यांच्यासह जिल्ह्यातील अनेक पत्रकार उपस्थित होते. पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संरक्षणासाठी सर्व पत्रकारांनी एकजुटीने लढा देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles