अरविंद सरनोबत यांना ‘राज्यस्तरीय आयडॉल शिक्षक’ सन्मान! ; वेत्येच्या शिरपेचात मानाचा तुरा, सरपंच गुणाजी गावडे यांच्याकडून विशेष अभिनंदन!

सावंतवाडी : शिक्षण हे केवळ पाठ्यपुस्तकांपुरते मर्यादित न ठेवता विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने झटणारे वेत्ये येथील जिल्हा परिषद शाळेचे उपक्रमशील शिक्षक अरविंद सरनोबत यांच्या कार्याचा राज्यस्तरावर गौरव झाला आहे. त्यांची ‘राज्यस्तरीय आयडॉल शिक्षक’ म्हणून निवड होऊन ‘उपक्रमशील आदर्श शिक्षक’ या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. या मानाच्या पुरस्कारामुळे वेत्ये गावासह संपूर्ण सावंतवाडी तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव उंचावला आहे.

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य गुणगौरव सोहळ्यात सावंतवाडी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी शोभराज शेर्लेकर यांच्या हस्ते श्री. सरनोबत यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या शैक्षणिक योगदानाचा उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात गौरव केला.

या सोहळ्यास सावंतवाडी पंचायत समितीच्या सभापती सौ. सुष्मिता जाधव, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर म. ल. देसाई, केंद्रप्रमुख श्री. ठाकूर, रायगड जिल्हा परिषदेचे लेखाधिकारी पांडुरंग थोरात यांच्यासह अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटनेचे पदाधिकारी, शिक्षकवृंद आणि अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री. सरनोबत यांनी विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी, आधुनिक शैक्षणिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, विविध शैक्षणिक उपक्रम, संस्कारमूल्यांचे संवर्धन आणि समाजाभिमुख शालेय उपक्रम यशस्वीपणे राबवून शिक्षण क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत राज्यस्तरावर हा बहुमान प्रदान करण्यात आला.

दरम्यान, या यशाबद्दल वेत्ये ग्रामपंचायतीचे आदर्श सरपंच गुणाजी गावडे यांनी अरविंद सरनोबत यांचे विशेष अभिनंदन करत, “हा सन्मान केवळ एका शिक्षकाचा नसून संपूर्ण वेत्ये गावाच्या शैक्षणिक परंपरेचा अभिमान आहे. त्यांच्या कार्यातून अनेक शिक्षकांना प्रेरणा मिळेल,” असा विश्वास व्यक्त केला. तसेच भविष्यातही त्यांच्या कार्याला अशीच उत्तरोत्तर यशाची भरारी लाभो, अशा मनःपूर्वक शुभेच्छाही त्यांनी दिल्या.

अरविंद सरनोबत यांच्या राज्यस्तरीय गौरवामुळे वेत्ये गावात आनंदाचे वातावरण असून, विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या कार्यामुळे ग्रामीण भागातील शिक्षणालाही नवी दिशा आणि प्रेरणा मिळत असल्याची भावना शिक्षणप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles