सावंतवाडी : शहरालगतच्या मळगाव घाटात आज सायंकाळी थरारक आणि धक्कादायक अपघात घडला. लग्न समारंभ आटोपून घरी परतत असताना इको कारचा चालकाचा ताबा सुटल्याने गाडी थेट खोल दरीत कोसळली. सुमारे सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास डीके टुरिझम हॉल परिसरात ही दुर्घटना घडली.
या भीषण अपघातात गाडीचे अक्षरशः चक्काचूर झाले असून, त्यामधील चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी सर्वजण सावंतवाडीतील सालईवाडा येथील शिरसाट कुटुंबीय असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
अपघातानंतर काही क्षण परिसरात भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. दरीत कोसळलेल्या वाहनातील जखमींना बाहेर काढण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ, प्रवासी आणि काही सामाजिक कार्यकर्ते धावून आले. मात्र, मदतकार्य सुरू असतानाच त्या ठिकाणी गांधील माशांनी अचानक हल्ला चढवला, त्यामुळे बचावकार्याला मोठा अडथळा निर्माण झाला. तरीही धैर्य न सोडता मदतकार्य सुरूच ठेवण्यात आले.

सामाजिक बांधिलकीचा उत्तम नमुना –
या संकटसमयी अनेकांनी जीवाची पर्वा न करता मदतीचा हात पुढे केला. रवी जाधव, मायकल डिसोजा, विशाल बांदेकर, राजू, राहुल, मनोज नार्वेकर, नारायण चव्हाण, बाळा नार्वेकर, शुभम कळसुलकर, सुधीर जडिये, राकेश मसुरकर, अजित जाधव यांच्यासह इतर ग्रामस्थांनी अथक प्रयत्न करत जखमींना दरीतून बाहेर काढले.
यानंतर जखमींना तात्काळ रुग्णवाहिकेद्वारे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
घाटातील धोकादायक वळणे पुन्हा चर्चेत –
या अपघातामुळे मळगाव घाटातील धोकादायक वळणे आणि सुरक्षा उपाययोजनांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. स्थानिक नागरिकांकडून प्रशासनाने तातडीने सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.
एकूणच, लग्नाचा आनंद काही क्षणांतच दुःखद प्रसंगात बदलला असून, या अपघाताने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.



