सिंधुदुर्ग : सांगली जिल्ह्यातील मिरज येथे नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया अधिवेशनात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे यांच्या उल्लेखनीय कार्याचा राज्यस्तरावर सन्मान करण्यात आला. प्रशासनातील पारदर्शकता, कार्यक्षमता आणि डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करून जनतेशी संवाद साधण्याच्या त्यांच्या अभिनव पद्धतीची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या अधिवेशनात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे यांना सन्मानचिन्ह आणि पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांनी नागरिकांना अधिक सक्षम सेवा मिळण्यास मदत झाली आहे. विशेषतः डिजिटल माध्यमांद्वारे तक्रार निवारण, माहितीचा जलद प्रसार आणि प्रशासनातील पारदर्शकता यामुळे जिल्हा प्रशासनाने वेगळी ओळख निर्माण केली आहे.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पुष्पगुच्छ देत त्यांचे अभिनंदन केले. त्यांनी यावेळी सांगितले की, “तृप्ती धोडमिसे यांच्या कार्यपद्धतीमुळे प्रशासन आणि जनतेतील दरी कमी झाली असून, डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर हा इतर जिल्ह्यांसाठीही आदर्श ठरत आहे.”
या सन्मानामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव राज्यभर उज्ज्वल झाले असून, प्रशासनातील नव्या संकल्पनांना चालना मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे.



