सावंतवाडी : तालुक्यातील चौकुळ येथील चौकुळ इंग्लिश स्कूलने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना (NMMS) २०२५-२६ परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. इयत्ता आठवीतील एकूण १४ विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. त्यापैकी तब्बल ९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, शाळेचा यशाचा टक्का लक्षणीय ठरला आहे.
यामध्ये विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे कुमारी अनुजा अर्जुन परब आणि कुमार संतोष लक्ष्मण पाटील या दोन विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवत केंद्र सरकारच्या NMMS शिष्यवृत्तीस पात्र ठरून प्रत्येकी ४८ हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळवली आहे.
या यशामुळे शाळेच्या नावलौकिकात भर पडली असून संपूर्ण परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडीचे अध्यक्ष श्री. विक्रांत विकासभाई सावंत, उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, सचिव श्री. व्ही. बी. नाईक, खजिनदार श्री. सी. एल. नाईक, शाळा समिती अध्यक्ष श्री. बागवे सर तसेच सर्व संस्था सदस्यांनी अभिनंदन केले आहे.
याशिवाय मुख्याध्यापिका एस. एस. दळवी, पालक-शिक्षक संघ, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे व पालकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
चौकुळ इंग्लिश स्कूलचे हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.



