गुणवत्तेचा झंकार, यशाची परंपरा अपरंपार! ; संस्कार नॅशनल स्कूलची SSC परीक्षेत यशाची देदिप्यमान भरारी!

सावंतवाडी : ग्रामीण मातीतून उमलणाऱ्या गुणवत्तेच्या सुवर्ण कोंभांनी पुन्हा एकदा आपली चमक दाखवून दिली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या माध्यमिक शालान्त परीक्षा सन २०२५-२६ (इयत्ता दहावी) च्या निकालात निरवडे येथील संस्कार नॅशनल स्कूल ने शैक्षणिक गुणवत्तेचा उंचावलेला झेंडा अभिमानाने फडकावत शंभर टक्के निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे.

ज्ञान, संस्कार आणि शिस्त यांचा सुंदर संगम जपणाऱ्या या विद्यालयाने केवळ निकालात यश मिळवले नाही, तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये दडलेली बुद्धिमत्ता आणि जिद्द यांचे प्रभावी दर्शन घडवले आहे. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशामुळे संपूर्ण निरवडे पंचक्रोशीत आनंद आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यंदाच्या निकालात सात विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणी मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली, तर उर्वरित सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. प्रशालेतील गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक कुमार निशाद नित्यानंद प्रभू (८९.४०%), द्वितीय क्रमांक कुमारी सिद्धी लक्ष्मण राऊत (८८.४०%) आणि तृतीय क्रमांक कुमार ओम बाबू नाईक (८७.००%) यांनी पटकावत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

या उज्ज्वल यशामागे विद्यार्थ्यांची अथक मेहनत, शिक्षकांचे समर्पित मार्गदर्शन आणि पालकांचा विश्वास ही त्रिसूत्री महत्त्वाची ठरल्याचे मत शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. प्रणाली रेडकर मॅडम यांनी व्यक्त केले. त्या म्हणाल्या, “विद्यार्थ्यांनी वर्षभर सातत्याने घेतलेली मेहनत, नियमित सराव परीक्षा, वैयक्तिक मार्गदर्शन (Personal Mentoring) आणि शिक्षकांचे नियोजनबद्ध अध्यापन यामुळेच विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेत आत्मविश्वासाने यश संपादन करता आले.”

निकाल जाहीर होताच शाळेच्या परिसरात उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. यशस्वी विद्यार्थ्यांचे स्वागत अभिनंदनाच्या वर्षावात झाले, तर शिक्षक व पालकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य खुलले.

संस्थाचालक श्री. शेखर जैन सर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना सांगितले, “संस्कार, शिस्त आणि गुणवत्ता या ब्रीदवाक्याला साजेशी कामगिरी विद्यार्थ्यांनी केली आहे. हे यश केवळ गुणांचे नाही, तर विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास, चिकाटी आणि जिद्दीचे प्रतीक आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य दिशा आणि संधी मिळाल्यास ते कोणत्याही क्षेत्रात आपला ठसा उमटवू शकतात, हे पुन्हा सिद्ध झाले आहे.”

संस्कार नॅशनल स्कूलचा हा निकाल म्हणजे केवळ शैक्षणिक यश नाही, तर ग्रामीण भागातील शैक्षणिक क्रांतीचे प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे. विद्यार्थ्यांच्या या दैदिप्यमान यशामुळे निरवडे पंचक्रोशीच्या शैक्षणिक परंपरेला नवसंजीवनी मिळाली आहे.

सर्व यशस्वी विद्यार्थी, पालक आणि मार्गदर्शक शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले असून  त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा प्रदान करण्यात येत आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles