तब्बल ४६ वर्षांनंतर पुन्हा रंगला गुरू-शिष्यांचा ऋणानुबंध! ; मडुरा हायस्कूलच्या १९७९-८० बॅचचा भावनिक स्नेहमेळावा उत्साहात! ; शाळेला दिल्या विविध भेटवस्तू.

सावंतवाडी : “विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील प्रेमाचे ऋणानुबंध अशा स्नेहमेळाव्यांमुळे अधिक दृढ होत असतात,” असे भावपूर्ण प्रतिपादन माजी मुख्याध्यापक बी. एन. तेली  यांनी केले. ते मडुरा हायस्कूल येथे तब्बल ४६ वर्षांनंतर आयोजित करण्यात आलेल्या एस.एस.सी. १९७९-८० बॅचच्या भव्य स्नेहमेळाव्यात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
या प्रसंगी माजी मुख्याध्यापक अन्वर खान सर ,श्री. पराष्टेकर सर,  ज. ला. बांदेकर सर, श्री. पांगम सर, श्री. पाटील सर, श्री. घाटवळ सर, श्री. पिळणकर सर, सौ. पुराणिक मॅडम, श्री. कोरगावकर सर, श्री. नाईक सर आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी आपल्या मनोगतातून जुन्या आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांना जीवनमूल्यांचा संदेश दिला.
तब्बल ४६ वर्षांनी एकत्र आलेल्या या स्नेहमेळाव्यात गुरु-शिष्यांचे भावनिक नाते आणि परस्परांतील जिव्हाळा प्रकर्षाने जाणवला. ६२ ते ६५ वयोगटातील विद्यार्थी आणि ८५ ते ९५ वर्षे वयोगटातील गुरुवर्य यांचा उत्साह मात्र बालपणालाही लाजवेल असा होता. विविध उच्च पदांवर कार्यरत राहिलेले, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवलेले माजी विद्यार्थी शाळेच्या ओढीने पुन्हा एकदा विद्यार्थी बनून आपल्या गुरूंच्या भेटीसाठी आतुर झाले होते.
कार्यक्रमाची सुरुवात गुरुवंदन, औक्षण आणि विद्यादेवता शारदामातेच्या पूजनाने करण्यात आली. विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेली मनोगते अत्यंत भावनिक आणि जुन्या आठवणींना उजाळा देणारी ठरली. तर गुरुवर्यांचे विचारही प्रेरणादायी आणि स्नेहपूर्ण होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बॅचमधील प्रथम विद्यार्थी श्री. परशुराम गावडे यांनी अत्यंत आपुलकीने केले. यावेळी सर्व गुरुवर्यांचा प्रत्येक विद्यार्थ्याकडून शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, भेटवस्तू आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. स्नेहमेळाव्याचे महत्त्व समिती अध्यक्ष श्री. आनंद परब यांनी विषद केले.
विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून लवू गावडे, मुक्ता बागायतकर, पुरुषोत्तम पंडित, प्रकाश काकतकर, आनंद परब आणि सदाशिव गाड यांनी मनोगते व्यक्त केली. सूत्रसंचालन श्री. नितीन नाईक यांनी तर आभार प्रदर्शन श्री. प्रताप परब यांनी केले. रुचकर स्नेहभोजनानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण अधिक रंगतदार झाले.
या स्नेहमेळाव्यास 25 माजी गुरुवर्य आणि 60 हून अधिक विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून ऋणानुबंध अधिक दृढ केले. शाळेबद्दलची कृतज्ञता व्यक्त करताना आ. मुक्ता बागायतकर यांनी पोडियम माईक, अनिता पराष्टेकर यांनी कुलर, पुरुषोत्तम पंडित यांनी शारदा मूर्ती भेट दिली. तसेच श्री. परशुराम गावडे यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ दहावीमध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास दरवर्षी ₹ ५,०००/ चे पारितोषिक जाहीर केले.
याशिवाय संपूर्ण बॅचकडून शाळेच्या सुरक्षेसाठी दोन सीसीटीव्ही कॅमेरे बसवून देण्यात आले. आजी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचाही यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. “हा ऋणानुबंध पुढील पिढ्यांपर्यंत जपण्यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील राहू,” अशी ग्वाही उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी दिली.
या कार्यक्रमास प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. सायली परब मॅडम, शालेय समिती सदस्य, धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईचे कार्याध्यक्ष डॉ. मिलिंद तोरसकर तसेच कार्यकारिणी सदस्यांनी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles