मैत्रीच आयुष्याला आनंदाची खरी ऊर्जा देते! : श्यामसुंदर मालवणकर. ; तळवडे येथील श्री जनता विद्यालयाच्या १९८९ च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात.

तळवडे : “आनंदी जीवन जगण्यासाठी लागणारी ऊर्जा केवळ मित्रच देऊ शकतात. मैत्रीचं नातं अतूट असतं, ते जपा. आजवर इतरांसाठी जगलात, आता स्वतःसाठीही जगायला सुरुवात करा,” असे भावस्पर्शी प्रतिपादन श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, तळवडेचे माजी मुख्याध्यापक श्यामसुंदर मालवणकर यांनी केले.
ते श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, तळवडे येथील १९८९ च्या इयत्ता दहावी तसेच १९९१ च्या इयत्ता बारावीच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्यात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाध्यक्ष म्हणून तळवडे शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार डॉ. भालचंद्र कांडरकर, संस्था सदस्य सुरेश गावडे, विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रतापराव देसाई, मळेवाड हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक जगदीश तिरपुडे, निवृत्त कलाशिक्षक शंकर कोंडये, विद्यालयाचे निवृत्त कर्मचारी गणपत कावळे, मळेवाड हायस्कूलचे निवृत्त कर्मचारी चंद्रकांत शेटकर, शिक्षक प्रसाद आडेलकर, किशोर नांदिवडेकर, शिक्षिका सौ. मिलन देसाई, लिपिक आनंद मोर्ये आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर गणेश वंदना व सरस्वती वंदना सादर करण्यात आली. निवृत्त शिक्षकांचे पंचारतीने औक्षण करून त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी मुख्याध्यापक प्रतापराव देसाई, माजी मुख्याध्यापक शामसुंदर मालवणकर, जगदीश तिरपुडे, निवृत्त कलाशिक्षक शंकर कोंडये, गणपत कावळे, चंद्रकांत शेटकर, शिक्षक प्रसाद आडेलकर, किशोर नांदिवडेकर, शिक्षिका सौ. मिलन देसाई, लिपिक आनंद मोर्ये तसेच कर्मचारी सत्यवान परब यांचा माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
तसेच माजी विद्यार्थी तथा निवृत्त सैनिक नित्यानंद सावंत, राजाराम दळवी, विजय काष्टे, ममता पेडणेकर, अरुणा कामत, शिल्पा पाटकर, प्रमोद रेडकर, गजानन शिरोडकर आणि न्हानू उर्फ दादा पेडणेकर यांचाही यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.
माजी विद्यार्थ्यांनी विद्यालयाला पुस्तक संच भेट दिला. तसेच माजी विद्यार्थी मोतीराम धारगळकर यांनी पाच हजार रुपयांची देणगी प्रदान केली. सर्व माजी विद्यार्थ्यांकडून विद्यालयाला राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमाही भेट देण्यात आल्या.
यावेळी बोलताना मुख्याध्यापक प्रतापराव देसाई म्हणाले, “आपण सर्व समवयस्क आहोत. स्नेहमेळाव्यातील भावना माझ्याही मनात आहेत. असेच वारंवार शाळेत या. मुख्याध्यापक म्हणून तुमचे स्वागत करताना नेहमीच आनंद वाटेल.”
यावेळी जगदीश तिरपुडे, नित्यानंद सावंत, राजाराम दळवी, विजय काष्टे, ममता पेडणेकर, अरुणा कामत, शिल्पा पाटकर, प्रमोद रेडकर, गजानन शिरोडकर, न्हानू उर्फ दादा पेडणेकर तसेच श्री. भाटवडेकर यांनी मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन शिरोडकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन ममता पेडणेकर यांनी केले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles