सावंतवाडी : तालुक्यातील कारिवडे येथे नातेवाईकांच्या साखरपुडा समारंभात आलेल्या महिलेच्या पर्समधून सुमारे ३ लाख ९० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सौ. क्रांती सावंत (रा. नरडवे, ता. कणकवली) या १२ मे रोजी सकाळी आपल्या पतीसमवेत नातेवाईकांच्या साखरपुडा समारंभासाठी एसटी बसने नरडवे–कणकवली–सावंतवाडी मार्गे कारीवडे येथे गेल्या होत्या. त्यांच्या पर्समध्ये डबीत मंगळसूत्र, सोन्याचा हार, अंगठ्या आदी दागिने ठेवले होते.
साखरपुड्याच्या ठिकाणी त्यांनी पर्स लग्नघरात ठेवून काही वेळासाठी वॉशरूमला गेल्या. सुमारे दहा मिनिटांनी परत आल्यानंतर पर्स तपासली असता त्यातील सोन्याचे दागिने गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी लग्नघर परिसरात सर्वत्र शोध घेतला; मात्र दागिन्यांचा कोणताही मागमूस लागला नाही.
समारंभानंतर घरी परतल्यानंतरही त्यांनी दागिने घरात राहिले नसल्याची खात्री केली. तसेच दुसऱ्या दिवशी पुन्हा कारीवडे येथे जाऊन शोध घेतला; मात्र दागिने न सापडल्याने त्यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार दीपक शिंदे करीत आहेत.



