रेल्वे प्रवाशांची ताकद अन् एकजूट दाखविणारी ‘सिंधुदुर्ग रेल्वे परिषद’ १७ मे रोजी कसाल येथे होणार.

सिंधुदुर्गनगरी :  कोकण रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या कोकणी प्रवाशांना भेडसावणाऱ्या विविध समस्या, गैरसोयी आणि रेल्वे सुविधांबाबत चर्चा करून त्यावर प्रभावी तोडगा काढण्यासाठी येत्या १७ मे रोजी कसाल येथील साई माऊली ब्लँकेट हॉलमध्ये ‘सिंधुदुर्ग रेल्वे परिषद’ आयोजित करण्यात आली आहे.
या परिषदेला जिल्ह्यातील रेल्वे प्रवासी, भूमिपुत्र, मुंबईकर चाकरमानी, महिला बचतगट, सरपंच, सामाजिक संघटना तसेच लोकप्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रेल्वे प्रशासन आणि शासनाचे लक्ष वेधावे, असे आवाहन कोकण रेल्वे प्रवासी समन्वय व संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रकाश पावसकर आणि जिल्हा समन्वयक ॲड. नंदन वेंगुर्लेकर यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मुंबईहून मडगाव, कारवारकडे धावणाऱ्या ८५ हून अधिक गाड्यांपैकी केवळ ३२ गाड्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात थांबतात. त्यामध्येही परप्रांतीय प्रवाशांची मोठी गर्दी असल्याने स्थानिक कोकणी प्रवाशांना अनेकदा संडासाजवळ किंवा दरवाज्यात बसून प्रवास करावा लागतो.
तसेच तुतारी-दादर गाडीला अतिरिक्त डबे जोडावेत, वसई-मडुरे, दादर-सावंतवाडी यांसारख्या नव्या गाड्या सुरू कराव्यात, अशा विविध मागण्या रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने करण्यात येत आहेत. मात्र प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने रत्नागिरी-सिंधुदुर्गातील प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याचे समितीने सांगितले.
प्रवासी समन्वय समितीने सातत्याने पाठपुरावा करून काही प्रश्न सोडवले असले तरी अनेक प्रश्न प्रलंबित असल्याने ही परिषद आयोजित करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.
या परिषदेला खासदार नारायणराव राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, सदस्य, विविध लोकप्रतिनिधी, रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी, जिल्हा प्रशासनातील अधिकारी तसेच विविध रेल्वे प्रवासी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
याशिवाय जिल्ह्यातील रेल्वे प्रवासी संघटनांचे सदस्य, महिला प्रतिनिधी, बचतगट, ग्रामस्थ आणि सामाजिक संघटनांनाही निमंत्रित करण्यात आले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच होत असलेल्या या रेल्वे परिषदेमध्ये रेल्वे प्रवाशांच्या विविध समस्या मांडल्या जाणार असून, विविध मागण्यांची निवेदनेही स्वीकारण्यात येणार आहेत.
कोकण रेल्वे प्रवासी संघर्ष आणि समन्वय समितीमार्फत जिल्ह्यातील दहा प्रमुख रेल्वे स्थानकांच्या समस्या रेल्वेमंत्री, लोकप्रतिनिधी आणि रेल्वे प्रशासनापर्यंत पोहोचवण्यात आल्या आहेत. खासदार नारायणराव राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतून काही मागण्यांना यश मिळाले असून, सिंधुदुर्ग आणि कणकवली स्थानकांवर प्रत्येकी दोन गाड्यांना थांबा मिळाला आहे. तसेच सिंधुदुर्ग स्थानकावर पीआरएस तिकीट काउंटर सुरू करण्यात आले आहे.
याशिवाय
नांदगाव येथे स्वतंत्र तिकीट काउंटर,
वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्ग,
सावंतवाडी-बेळगाव रेल्वेमार्ग,
नांदगाव-देवगड-मालवण-वेंगुर्ले-सावंतवाडी किनारपट्टी रेल्वेमार्ग,
सिंधुदुर्गातील रेल्वे दुपदरीकरणाची गती वाढविणे,
अशा अनेक महत्त्वाच्या मागण्या परिषदेत मांडल्या जाणार आहेत.
रेल्वे दुपदरीकरणामुळे मुंबईकडे जाणाऱ्या जलद गाड्यांचा वेळ कमी होईल तसेच रत्नागिरी-सिंधुदुर्गातील अधिक स्थानकांना गाड्यांचे थांबे मिळतील, असा समितीचा विश्वास आहे.
“प्रवाशांच्या समस्या आणि कोकणवासीयांच्या हक्काच्या सुविधा मिळवण्यासाठी ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. रेल्वे प्रवासी, मुंबईकर चाकरमानी, लोकप्रतिनिधी, महिला संघटना, सामाजिक संस्था आणि सर्व सिंधुदुर्गवासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कोकणवासीयांची ताकद आणि एकजूट दाखवून द्यावी,” असे आवाहन अध्यक्ष प्रकाश पावसकर आणि जिल्हा समन्वयक ॲड. नंदन वेंगुर्लेकर यांनी केले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles