पार्थ पवारांना समज द्या, अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये मोठ्या घडामोडी. ; संघर्ष वाढल्याने विषय थेट शरद पवारांच्या कोर्टात.

मुंबई : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची चर्चा आहे. सुनेत्रा पवार गट आणि शरद पवार गट. सुनेत्रा पवार गट हा अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. पण अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सर्वकाही आलबेल नसल्याचं समोर येत आहे. अजितदादांच्या निधनानंतर अवघ्या चार महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत मतभेदांच्या बातम्या समोर येऊ लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीवरून काही नेत्यांमध्ये नाराजी असल्याचं बोललं जात आहे. कारण पक्षाकडून निवडणूक आयोगाला सादर केलेल्या पत्रात अनेक नेत्यांच्या नावासमोर पदाचा उल्लेख नाहीय. केंद्रीय निवडणूक आयोगाला पक्षाकडून सादर करण्यात आलेल्या पत्रात खासदार सुनील तटकरे यांच्या नावासमोर प्रदेशाध्यक्ष पदाचा उल्लेख नाहीय. या यादीत सुनेत्रा पवार यांच्या नावासमोर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून उल्लेख आहे. तसेच पार्थ पवार आणि जय पवार यांची जनरल सेक्रेटरी म्हणून नोंद करण्यात आली आहे. पक्षातील वरिष्ठ नेते प्रफुल पटेल, छगन भुजबळ आणि सुनिल तटकरे यांची नावं प्रमुख पदांमध्ये नसल्याने उलट-सुलट राजकीय चर्चा सुरु झाल्या आहेत. विशेष बाब म्हणजे अरुणाचल प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष टोको तातूंग यांच्या नावासमोर प्रदेशाध्यक्ष असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. पण सुनिल तटकरे यांच्या बाबतीत असं घडलेलं नाही.

दादा असताना असं काही घडत नव्हतं –

दरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील बड्या नेत्याने पार्थ पवार यांची शरद पवार यांच्याकडे तक्रार केल्याची सूत्रांची माहिती आहे. शरद पवारांनी कुटुंब प्रमुख म्हणून पार्थ पवारांना समज द्यावी अशी बड्या नेत्याने शरद पवार यांच्याकडे मागणी केली आहे. आम्ही सुद्धा पक्षासाठी अहोरात्र मेहनत घेतली आहे. दादा असताना असं काही घडत नव्हतं, असं या नेत्याने पवारांकडे मत मांडलं. आमचा मान सन्मान राखला पाहिजे असं आम्हाला वाटतय, असं या बड्या नेत्याने पवारांना सांगितलं.

सुनील तटकरे शरद पवारांना का भेटलेले?

आता हा बडा नेता कोण ते अजून समोर आलेलं नाही. पण नुकतीच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शरद पवार यांची सिलव्हर ओक निवासस्थानी भेट घेतली होती. अनेक वर्षांनी सुनील तटकरे हे शरद पवार यांच्या भेटीसाठी गेले होते. ही भेट राजकीय नव्हती, शरद पवारांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी त्यांना भेटलो असं सुनील तटकरे यांनी सांगितलं होतं.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का?

दरम्यान दुसरीकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची पुण्यात बैठक पार पडली. आता मुंबईत बैठक बोलवण्यात आली आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसना एकत्र यायचं असेल तर अजितदादांच्या राष्ट्रवादीला भाजपं विरोधी भूमिका घ्यावी लागेल असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles