‘मिनी काश्मीर’वर भूमाफियांचा डोळा! अब्जावधींची सामाईक जमीन गिळंकृत करण्याचा डाव. ; २० मे रोजी होणारी मोजणी उधळून लावण्याचा शिरशिंगेकरांचा एल्गार!”

सावंतवाडी: सह्याद्रीच्या हिरव्यागार कुशीत विसावलेले आणि सिंधुदुर्गचे ‘मिनी काश्मीर’ म्हणून ओळखले जाणारे शिरशिंगे गाव सध्या एका प्रचंड भूमीघोटाळ्याच्या उंबरठ्यावर उभे ठाकले आहे. जैवविविधतेने नटलेल्या आणि अब्जावधी रुपयांची किंमत असलेल्या सामाईक जमिनींवर भूमाफिया, धनाढ्य दलाल आणि महसूल विभागातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी संगनमताने डल्ला मारल्याचा स्फोटक आरोप ग्रामस्थांनी केला असून, संपूर्ण गाव आता संतापाच्या ज्वालामुखीवर उभे आहे.
गावातील सर्व्हे नं. ३२, ३३, ३४, २० आणि ९९ मधील सामाईक जमिनी बेकायदेशीर व्यवहारातून गिळंकृत करण्याचा घाट घालण्यात आला असून, या कटाचा भाग म्हणून येत्या २० मे रोजी प्रशासनाकडून प्रस्तावित जमीन मोजणी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, “ही मोजणी कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही,” असा इशारा देत शिरशिंगेतील ग्रामस्थ, तरुण आणि चाकरमानी आक्रमक झाले आहेत.


या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांची भेट घेत संतप्त निवेदन सादर केले. निवेदनात करण्यात आलेल्या आरोपांमुळे महसूल प्रशासनात खळबळ उडाली आहे.
शिरशिंगे गावातील तब्बल ८० टक्के भूभाग हा घनदाट जंगल, दुर्मिळ जैवविविधता आणि निसर्गसंपदेने परिपूर्ण आहे. विशेषतः सर्व्हे नं. ३२/१/ब ही मिळकत तब्बल ६९१.८५ हेक्टर आर एवढ्या अफाट क्षेत्रात पसरलेली असून, सुमारे ८५० हून अधिक सहभागधारकांची ती एकत्रित आणि अविभक्त सामाईक मालमत्ता आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कितवडे गावाच्या सीमेलगत आणि गेळे-कावळेसाद पॉईंट परिसरात वसलेली ही जमीन निसर्गवैभवामुळे ‘सोन्याची खाण’ मानली जात आहे. आणि याच संपत्तीवर आता भूमाफियांची गिधाडासारखी नजर पडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.


ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, काही दलालांनी महसूल विभागातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून गरीब, अशिक्षित आणि आर्थिक विवंचनेत असलेल्या शेतकऱ्यांना पैशांचे आमिष दाखवत सामाईक जमिनींची खरेदी सुरू केली आहे. धक्कादायक म्हणजे, या व्यवहारांवेळी इतर सहमालकांना कोणतीही नोटीस, पूर्वपरवानगी किंवा कायदेशीर माहिती देण्यात आलेली नाही. “नियमांना केराची टोपली दाखवत महसूल खात्याच्या आशीर्वादानेच हा काळाबाजार सुरू आहे,” असा थेट आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
या प्रकरणाविरोधात ग्रामस्थांनी अनेकदा निवेदने, तक्रारी आणि पाठपुरावा करूनही प्रशासनाने डोळेझाक केल्याचा आरोप होत आहे. उलट, पैशांच्या जोरावर आणि कायद्याच्या पळवाटा शोधत संबंधित एजंटांनी आता २० मे रोजी मोजणीचा डाव आखला आहे. त्यामुळे गावात संतापाची लाट उसळली आहे.
दरम्यान, गावात झालेल्या तातडीच्या बैठकीत एकमुखी ठराव करत ग्रामस्थांनी “मोजणीचा हा डाव उधळून लावू” असा एल्गार पुकारला. बाहेरील एजंट, दलाल आणि संशयित व्यक्तींना गावात पाऊल ठेवू देणार नाही, असा निर्धार व्यक्त करण्यात आला. तसेच या संपूर्ण प्रकरणामागील ‘मास्टरमाइंड’ कोण, याचा शोध घेऊन त्यांना उघडे पाडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
२० मे रोजी होणारी मोजणी रोखण्यासाठी मुंबई, पुणे आणि इतर शहरांत वास्तव्यास असलेल्या चाकरमान्यांनी मोठ्या संख्येने गावात उपस्थित राहावे, असे जाहीर आवाहन करण्यात आले असून, शिरशिंगे आता भूमाफियांविरोधातील निर्णायक लढाईसाठी सज्ज झाले आहे.
तहसीलदार श्रीधर पाटील यांना निवेदन देताना विद्यमान सरपंच दीपक राऊळ, माजी सरपंच नारायण राऊळ, माजी उपसरपंच पांडुरंग राऊळ, जीवन लाड, सामाजिक कार्यकर्ते गणपत राणे, गजानन राऊळ, रामचंद्र भिंगारे, चंद्रकांत परब, अमित राऊळ यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
आता प्रशासन या संतप्त जनआक्रोशाची दखल घेऊन मोजणी स्थगित करणार की भूमाफियांच्या दबावाखाली पुढे जाणार, याकडे संपूर्ण सावंतवाडी तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles