विदर्भ-कोकण प्रवाशांसाठी आनंदवार्ता – नागपूर-मडगांव विशेष एक्स्प्रेसला नियमित दर्जा, रेल्वे बोर्डाची मंजुरी. ; वैभववाडी रोड, विलवडे, पेणसह अतिरिक्त थांब्यांची मात्र प्रतीक्षा कायम.

नागपूर : विदर्भ, खान्देश आणि कोकणाला थेट जोडणाऱ्या नागपूर-मडगाव विशेष एक्स्प्रेसबाबत रेल्वे प्रवाशांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातून धावणारी ०११३९/४० नागपूर-मडगाव विशेष एक्स्प्रेस आता नियमित रेल्वेगाडी म्हणून धावणार असून रेल्वे बोर्डाने तिला मंजुरी दिली आहे. ही गाडी आता ११२०३/०४ नागपूर-मडगाव एक्स्प्रेस या क्रमांकाने नियमित सेवेत दाखल होणार आहे.
नवरात्र, दिवाळी आणि नाताळ या गर्दीच्या हंगामात प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन सुरू करण्यात आलेल्या या विशेष रेल्वेला अपेक्षेपेक्षा मोठा प्रतिसाद मिळाला होता. विदर्भातून थेट कोकण रेल्वेमार्गावर जाण्यासाठी पर्यायी रेल्वेसेवा नसल्याने प्रवासी संघटना आणि रेल्वे प्रवाशांकडून ही गाडी कायमस्वरूपी सुरू करण्याची मागणी सातत्याने होत होती. अखेर रेल्वे बोर्डाने या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत गाडीला नियमित दर्जा बहाल केला आहे.
सुधारित वेळापत्रकानुसार ११२०३ नागपूर-मडगाव एक्स्प्रेस बुधवारी आणि शनिवारी दुपारी ३.०५ वाजता नागपूर जंक्शनहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५.४६ वाजता मडगाव (गोवा) येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात ११२०४ मडगाव-नागपूर एक्स्प्रेस गुरुवारी आणि रविवारी मडगावहून सायंकाळी ७.०१ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रात्री ९.४६ वाजता नागपूरला पोहोचणार आहे.
या रेल्वेला वर्धा जंक्शन, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, कुडाळ, थीवीम आणि करमळी (गोवा) या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.
मात्र, कोकण रेल्वेमार्गावरील वैभववाडी रोड, विलवडे तसेच मध्य रेल्वेमार्गावरील पेण, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, मूर्तिजापूर आणि चांदूर या स्थानकांवर अतिरिक्त थांबे देण्याची मागणी अद्याप प्रलंबित आहे. या भागातील प्रवाशांकडून अतिरिक्त थांब्यांसाठी पाठपुरावा सुरू असून रेल्वे प्रशासनाने त्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
या नियमित रेल्वेसेवेचे संगणकीय आरक्षण दि. १७ मे २०२६ पासून भारतीय रेल्वेच्या आरक्षण केंद्रांवर तसेच irctc.co.in⁠�, inquiry.indianrail.gov.in⁠� आणि NTES ॲपवर सुरू करण्यात येणार आहे.
दरम्यान, या रेल्वेसेवेचा अधिकाधिक प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रवासी सामाजिक संस्था कल्याण-सावंतवाडी (रजि.) चे संस्थापक अध्यक्ष सुनिल उत्तेकर, समन्वय समितीचे अध्यक्ष यशवंत परब, संपर्क प्रांतप्रमुख वैभव बहुतुळे यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles