शंभर टक्के यशाची ‘सुवर्णकन्या’. ; राज्यात अव्वल ठरलेल्या सान्वीचा सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळातर्फे भव्य गौरव!

सावंतवाडी : ज्ञान, जिद्द आणि अथक परिश्रम यांच्या बळावर यशाचे शिखर सर करणाऱ्या कुमारी सान्वी हिने दहावी बोर्ड परीक्षेत तब्बल १०० टक्के गुण मिळवत सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात प्रथम येण्याचा मान पटकावला. तिच्या या दैदिप्यमान यशाचा गौरव करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळातर्फे विशेष सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

या प्रसंगी विज्ञान मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग काकतकर यांच्या हस्ते सान्वीचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन जल्लोषात गौरव करण्यात आला. सभागृहात टाळ्यांचा कडकडाट होत असताना सान्वीच्या यशामागील तिचे अथक परिश्रम, आई-वडिलांचे संस्कार आणि गुरुजनांचे मोलाचे मार्गदर्शन यांचा गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला.

“मेहनतीच्या घामातूनच यशाचे मोती जन्म घेतात,” याची जणू प्रचितीच सान्वीच्या यशातून सर्वांना आली. तिच्या यशामुळे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा शैक्षणिक मान उंचावला असून सर्व स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

यावेळी दर्जेदार शिक्षणाची परंपरा जपणाऱ्या विद्यामंदिर हायस्कूलच्या मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच संस्थेचे विशेष अभिनंदन करण्यात आले. विज्ञान विषयात विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करणारे उपक्रमशील शिक्षक पृथ्वीराज बर्डे यांचाही विज्ञान मंडळातर्फे पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळाचे उपाध्यक्ष आर. के. कारेकर यांची कन्या असलेल्या सान्वीने मिळविलेल्या या ऐतिहासिक यशामुळे शिक्षण क्षेत्रात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कणकवली तालुका विज्ञान मंडळाचे अध्यक्ष सी. जी. चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या कौतुक सोहळ्याचे उत्कृष्ट नियोजन केले होते. या सोहळ्यास श्यामसुंदर राणे, सतीश वारंग, पृथ्वीराज बर्डे, प्रिती सावंत, तृप्ती देसाई, अनंत साईल, ऋषिकेश गावडे, सतीशकुमार कर्ले, दत्तप्रसाद परुळेकर, संतोष वैज, महेश भाट, महेश परब, सुनिल मेस्त्री आदी शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

सत्काराला उत्तर देताना सान्वीने नम्रपणे कृतज्ञता व्यक्त केली. “भविष्यातील शिक्षणातही असेच उत्तुंग यश संपादन करून आई-वडिलांचे, शाळेचे आणि समाजाचे नाव उज्ज्वल करायचे आहे,” असा निर्धार तिने व्यक्त केला.

कन्येच्या या अभूतपूर्व यशाने भारावलेल्या आई-वडिलांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आणि विज्ञान मंडळाचे मनःपूर्वक आभार मानले. सिंधुदुर्गच्या ज्ञानभूमीत उमललेल्या या ‘यशस्वी सुवर्णकन्या’कडे आता संपूर्ण जिल्ह्याचे अभिमानाने लक्ष लागून राहिले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles