“आमचं गाव वाचवा हो..! ” – आजगाव ब्लॉकमधील माती सर्वेक्षणाविरोधात ग्रामस्थांचा एल्गार! ; ‘निसर्गाशी खेळ थांबवा’ म्हणत प्रशासनाला भावनिक साकडे. 

सावंतवाडी / ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आजगाव ब्लॉक परिसरात प्रस्तावित करण्यात आलेल्या माती सर्वेक्षण आणि संभाव्य मायनिंग प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त करत प्रशासनाला भावनिक निवेदन सादर केले आहे. “आमची जमीन, आमचा निसर्ग आणि आमच्या पुढील पिढ्यांचे भविष्य वाचवा,” अशी आर्त हाक पर्यावरण बचाव संघर्ष समितीने दिली आहे.

पर्यावरण बचाव संघर्ष समिती, आजगाव ब्लॉक यांच्या वतीने जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, पंचक्रोशीतील अनेक ग्रामपंचायतींनी या प्रकल्पाला ठाम विरोध दर्शविला असतानाही संबंधित भागात माती सर्वेक्षणासाठी परवानगी दिली जात असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

आजगाव, धाकोरा, मळेवाड, भोमवाडी, आरवली, सोन्सुरे, सागरतीर्थ, आसोली आदी गावांतील ग्रामस्थांनी एकमुखाने विरोध नोंदवत, “हा परिसर केवळ जमीन नाही, तर आमच्या अस्तित्वाचा श्वास आहे,” अशी भावना व्यक्त केली आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, येथील शेती, पर्यटन आणि निसर्गसंपन्न जीवनशैलीवर या प्रकल्पाचा गंभीर परिणाम होऊ शकतो.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, समुद्रकिनारी आणि पर्यटनप्रधान असलेल्या या भागात मायनिंगसारखे प्रकल्प उभे राहिल्यास स्थानिक नागरिकांच्या उपजीविकेवर मोठा परिणाम होईल. रोजगार, शेती, पर्यावरण आणि सामाजिक शांतता धोक्यात येण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. “आमच्या हिरव्यागार डोंगरांना जखमा देणारे निर्णय आम्हाला मान्य नाहीत,” असा भावनिक सूरही ग्रामस्थांनी लावला आहे.

विशेष म्हणजे, संबंधित ग्रामसभांनी विरोधाचे ठराव मंजूर करून प्रशासनाकडे सादर केले असूनही सर्वेक्षण प्रक्रियेला पुढे नेले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून परवानगी प्रक्रिया स्थगित करावी, अशी जोरदार मागणी केली आहे.

“निसर्ग वाचला तरच गाव वाचेल, आणि गाव वाचलं तरच पुढची पिढी उभी राहील,” असा ठाम संदेश देत ग्रामस्थांनी संघर्ष अधिक तीव्र करण्याचा इशाराही दिला आहे.

यावेळी सजग नागरिक अजित रामचंद्र नातू, प्रशांत काकतकर, सुशील कामठेकर, ओमकार आजगावकर, राजेश आजगावकर, विठ्ठल मुळीक, मयुर आरोलकर, सुधाकर राणे, विलास चिपकर यांसह अन्य उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles