तुळस ग्रामपंचायतीला ‘रावे’ (RHWE) विद्यार्थ्यांची भेट! ; ६ महिन्यांच्या कृषी विकास आराखड्याबाबत सरपंचांशी चर्चा.

वेंगुर्ला: ग्रामीण भागातील शेतीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याच्या व आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने, उद्यानविद्या महाविद्यालय मुळदेच्या सात विद्यार्थ्यांनी ‘ग्रामीण उद्यानविद्या कार्य अनुभव’ (RHWE) कार्यक्रमांतर्गत तुळस (ता. वेंगुर्ला) गावात ६ महिन्यांच्या निवासी उपक्रमाला सुरुवात केली आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांनी नुकतीच तुळस ग्रामपंचायतीला सदिच्छा भेट दिली आणि महाविद्यालयाचे अधिकृत पत्र सरपंच सौ. रश्मी परब यांचा कडे सुपुर्द केले.
या विद्यार्थी गटामध्ये *ओम कुंभार, अरिन मोंडे, सिद्धार्थ चौधरी, धनंजय साळवी, अमित टोकसिया आणि दिनेश बिश्नोई* आदी विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

सरपंच रश्मी परब यांच्याशी सकारात्मक चर्चा – 
ग्रामपंचायत भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी तुळस गावच्या सरपंच *सौ. रश्मी परब* यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. पुढील ६ महिन्यांच्या कालावधीत गावात राबवल्या जाणाऱ्या विविध कृषीविषयक उपक्रमांचा आणि विकास कामांचा संपूर्ण आराखडा विद्यार्थ्यांनी सरपंचांसमोर मांडला. हे सातही विद्यार्थी पुढील ६ महिने याच गावात मुक्कामी राहून स्थानिक शेतकऱ्यांच्या सोबतीने काम करणार आहेत.
*आगामी ६ महिन्यांतील प्रमुख उपक्रम व कार्यपद्धती:*
विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायतीला दिलेल्या माहितीनुसार, आगामी काळात गावात खालील प्रमुख घटकांवर भर दिला जाणार आहे.
१) माती व पाणी परीक्षण – गावातील शेतजमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी आणि खतांचा योग्य वापर समजण्यासाठी व्यापक पातळीवर माती परीक्षण मोहीम राबवणे.
२) आधुनिक कीड व रोग व्यवस्थापन – पिकांवर पडणाऱ्या विविध रोगांचे वेळेत नियंत्रण करण्यासाठी शेतकऱ्यांना आधुनिक आणि जैविक उपाययोजनांचे प्रात्यक्षिक दाखवणे.
३) शासकीय योजनांची माहिती – केंद्र व राज्य सरकारच्या कृषी क्षेत्राशी संबंधित विविध अनुदाने, योजना आणि विमा पॉलिसींची माहिती थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवणे.
४) कृषी पूरक व्यवसाय मार्गदर्शन – शेतीला पूरक असणारे व्यवसाय जसे की पशुपालन, कुक्कुटपालन आणि सेंद्रिय शेती (Organic Farming) यांबाबत तरुणांसाठी कार्यशाळा आयोजित करणार

ग्रामपंचायतीकडून पूर्ण सहकार्याचे आश्वासन – 
विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक करत सरपंच रश्मी परब यांनी सर्व विद्यार्थ्यांचे गावात स्वागत केले. तसेच, विद्यार्थ्यांच्या या ६ महिन्यांच्या आखलेल्या उपक्रमांमध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही ही त्यांनी यावेळी दिली.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना ग्रामीण जीवन आणि शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष समस्या जवळून अनुभवण्याची संधी मिळणार असून, तुळस गावच्या कृषी विकासालाही एक नवी दिशा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles