✍️ रुपेश पाटील.
सावंतवाडी : धरणीवरचा स्वर्ग म्हणजे आपला कोकण. मात्र हा कोकण आणि इथली लाल माती खरेदी करण्यासाठी अनेक प्रकारचा महाजाल धन दांडग्या महाभागांनी रचला आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं आणि प्रत्यक्ष भगवंताला ही स्वप्न पडावं असा सुंदर गाव म्हणजे शिरशिंगे. कोण जाणे या गावातील सामायिक जमिनीला कोणाची नजर लागली आणि सुरू झाला तो येथील सामायिक जमीन खरेदीचा खेळ. पण म्हणतात ना “गाव करेल ते राव काय करेल!” होय. या म्हणीचा प्रत्यय आज शिरशिंगे गावात आला.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे ‘मिनी काश्मीर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निसर्गरम्य शिरशिंगे गावातील अब्जावधी रुपयांच्या सामाईक जमिनीवर डल्ला मारण्याचा भूमाफियांचा कथित डाव ग्रामस्थांनी एकजुटीच्या बळावर हाणून पाडला. गावातील सर्व्हे नं. ३२, ३३, ३४, २० आणि ९९ मधील जैवविविधतेने समृद्ध असलेल्या सामाईक क्षेत्राची आज होणारी जमीन मोजणी ग्रामस्थांच्या तीव्र विरोधामुळे अखेर रद्द करण्यात आली.
सुमारे ६९१ हेक्टरहून अधिक विस्तीर्ण क्षेत्र असलेल्या या जमिनीवर तब्बल ८५० हून अधिक सहभागधारकांची सामाईक मालकी आहे. मात्र काही दलाल आणि महसूल विभागातील संबंधित अधिकाऱ्यांच्या संगनमतातून गरीब शेतकऱ्यांना आमिष दाखवून, इतर भागधारकांना अंधारात ठेवत बेकायदेशीर खरेदी-विक्री व्यवहार झाल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या विरोधात ग्रामस्थांनी यापूर्वीच तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याकडे निवेदन देत संताप व्यक्त केला होता.
आज प्रशासनाकडून जमीन मोजणीसाठी अधिकारी गावात दाखल होताच शिरशिंगे पेटून उठले. गावातील तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच मुंबई-पुण्यासह विविध ठिकाणांहून आलेले चाकरमानी मोठ्या संख्येने एकत्र जमले. सरपंच दीपक राऊळ, माजी सरपंच नारायण राऊळ, माजी उपसरपंच पांडुरंग राऊळ, पोलिस पाटील गणू राऊळ, सामाजिक कार्यकर्ते गणपत राणे यांच्यासह शेकडो ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत अधिकाऱ्यांना जाब विचारला.
ग्रामस्थांचा वाढता संताप, जोरदार घोषणाबाजी आणि तीव्र विरोध पाहून प्रशासनाची अक्षरशः भंबेरी उडाली. अखेर परिस्थिती चिघळण्याची शक्यता लक्षात घेऊन अधिकाऱ्यांना कोणतीही मोजणी न करता गावातून माघारी फिरावे लागले.

शिरशिंगे ग्रामस्थांनी दाखवलेल्या अभूतपूर्व एकजुटीमुळे भूमाफियांच्या विरोधात मोठा संदेश गेला असून “जमीन वाचवण्यासाठी गाव एकवटले तर कोणतीही ताकद त्यांना रोखू शकत नाही,” अशी भावना परिसरातून व्यक्त होत आहे. सध्या संपूर्ण सावंतवाडी तालुक्यात ग्रामस्थांच्या या धाडसी भूमिकेचे जोरदार कौतुक होत आहे.



