सावंतवाडी : सावंतवाडी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी उभारलेले आणि शहराची ओळख बनलेले ऐतिहासिक घड्याळ गेल्या अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. एकेकाळी सावंतवाडीची “जान, शान आणि मान” म्हणून ओळखले जाणारे हे घड्याळ आज निर्जीव अवस्थेत उभे असून शहराच्या सौंदर्यावरही त्याचा परिणाम होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
या पार्श्वभूमीवर सावंतवाडीतील काही महिला नागरिकांनी एकत्र येत नगरसेविका मोहिनी मडगावकर यांच्याकडे लेखी निवेदन सादर केले. शहराच्या मध्यभागी असलेले हे ऐतिहासिक घड्याळ तातडीने दुरुस्त करून पूर्ववत सुरू करण्यात यावे, अशी ठाम मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
महिलांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, हे घड्याळ केवळ वेळ दाखवणारे साधन नसून सावंतवाडीच्या ऐतिहासिक परंपरेचे आणि सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक आहे. शहरात येणाऱ्या पर्यटकांचेही या घड्याळाकडे विशेष आकर्षण असते. त्यामुळे या ऐतिहासिक वास्तूचे जतन करून त्याला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देणे आवश्यक असल्याचे महिलांनी स्पष्ट केले.
नगरसेविका मोहिनी मडगावकर यांनी या मागणीची गांभीर्याने दखल घेत संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा करून आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.

सावंतवाडीकरांच्या भावनांशी जोडलेले हे ऐतिहासिक घड्याळ पुन्हा सुरू होऊन शहराच्या सौंदर्यात भर टाकेल, अशी अपेक्षा आता सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त होत आहे.



