संविधानाच्या विचारांतूनच गावाचा शाश्वत विकास शक्य. : चौकुळ सरपंच गुलाबराव गावडे. ; चौकुळ आदर्श समता नगर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात संपन्न. ; मान्यवरांचा सत्कार, महिला मेळावा व विविध स्पर्धांनी कार्यक्रमाला रंगत.

सावंतवाडी :  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त चौकुळ येथील आदर्श समता नगर परिसरात सामाजिक ऐक्य, बंधुता आणि संविधानिक मूल्यांचा जागर जागर होणारा प्रेरणादायी कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. चौकुळ बौद्ध विकास मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चौकुळ गावचे प्रथम नागरिक तथा सरपंच श्री. गुलाबराव गावडे हे उपस्थित होते. यावेळी त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, “गावाचा शाश्वत विकास ही केवळ ग्रामपंचायतीची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाने सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून गावाच्या प्रगतीसाठी योगदान देणे आवश्यक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या भारतीय संविधानामुळेच आज सामान्य माणूस लोकशाही प्रक्रियेत सहभागी होऊन विविध पदांवर कार्यरत आहे. त्यामुळे संविधानिक मूल्यांचे जतन करणे ही काळाची गरज आहे.”
यावेळी त्यांनी आदर्श समता नगरच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे स्पष्ट करत गावातील मूलभूत सुविधा, सामाजिक एकात्मता आणि युवकांच्या प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्न सुरू राहतील, असा विश्वास व्यक्त केला.


कार्यक्रमाला नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य श्री. मायकेल डिसोजा तसेच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि शिवसेना शाखाप्रमुख श्री. अभिजित मेस्त्री यांची प्रमुख उपस्थिती लाभली. दोन्ही मान्यवरांनीही समता नगरच्या विकासासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य आपल्या माध्यमातून केले जाईल, असे आश्वासन देत ग्रामस्थांना एकोप्याने काम करण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी चौकुळ बौद्ध विकास मंडळाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच मंडळाचे ज्येष्ठ सभासद श्री. बुधाजी जाधव, श्री. पुंडलिक जाधव आणि श्री. सुभाष जाधव यांचा विशेष सत्कार करून त्यांच्या सामाजिक योगदानाचा गौरव करण्यात आला.
सायंकाळच्या सत्रात लहान मुलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. महिला मेळाव्यालाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महिलांनी आणि युवकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत कार्यक्रमाला सामाजिक आणि सांस्कृतिक रंगत आणली.
यावेळी “सत्यार्थ महाराष्ट्र”चे मुख्य संपादक प्रा. रूपेश पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा समाजजीवनात अंगीकार करण्याचे महत्त्व विशद केले. शिक्षण, संघटन आणि संघर्ष या त्रिसूत्रीच्या माध्यमातून समाज परिवर्तन शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी चौकुळ बौद्ध विकास मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व सभासद यांनी विशेष परिश्रम घेतले. संपूर्ण परिसर “जय भीम”च्या घोषणांनी दुमदुमून गेला होता आणि सामाजिक ऐक्याचा प्रेरणादायी संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles