वेंगुर्ला : कोकणच्या लाल मातीत, हिरव्यागार रानावनात आणि पावसाळी सरींच्या कुशीत उगवणाऱ्या रानभाज्यांचा अस्सल दरवळ वेंगुर्ल्यातील पाककृती स्पर्धेत अनुभवायला मिळाला. पारंपरिक चवीला आधुनिक कल्पकतेची जोड देत महिलांनी रानभाज्यांपासून लाडू, मोदक, सरबत, चटणी, सूप, अप्पे अशा विविध नावीन्यपूर्ण पदार्थांची मेजवानी सादर केली. “रानभाज्या हा कोकणच्या मातीचा, निसर्गाचा आणि पारंपरिक खाद्यसंस्कृतीचा अनमोल ठेवा असून, हा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे,” असे प्रतिपादन वेदिका विशाल परब यांनी केले.
‘माझा वेंगुर्ला’, इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्ला आणि हिरकणी महिला शहर स्तर संघ, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच श्री. विशाल परब यांच्या पुरस्कृत ‘उत्सव रानभाज्यांचा २०२६’ अंतर्गत रानभाजी पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन वेदिका विशाल परब यांच्या हस्ते झाले.
यावेळी वेंगुर्ला नगराध्यक्ष राजन गिरप, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, भाजपचे ज्येष्ठ नेते राजू राऊळ तसेच भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना ऊर्फ बाळू देसाई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
‘रानभाजी’ म्हणजे केवळ भाजी नव्हे, तर कोकणची ओळख!
यावेळी बोलताना वेदिका परब म्हणाल्या की, “रानभाज्या म्हणजे आपल्या कोकणच्या खाद्यपरंपरेची ओळख आहे. पूर्वीच्या पिढ्यांच्या आहारात रानभाज्यांना अनन्यसाधारण महत्त्व होते. मात्र बदलत्या जीवनशैलीमुळे या पारंपरिक खाद्यपदार्थांचा वापर दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे रानभाज्यांचे महत्त्व नव्या पिढीला समजावून सांगण्यासोबतच त्यांचा विविध प्रकारे आहारात समावेश होणे गरजेचे आहे.”
रानभाज्यांपासून केवळ पारंपरिक भाजीच नव्हे, तर विविध चविष्ट, पौष्टिक आणि नावीन्यपूर्ण पदार्थ तयार करता येतात. स्पर्धेत सहभागी महिलांनी आपल्या कल्पकतेतून हे सिद्ध करून दाखविले. अशा उपक्रमांमुळे महिलांच्या पाककला कौशल्याला व्यासपीठ मिळते आणि त्याचवेळी कोकणच्या पारंपरिक खाद्यसंस्कृतीच्या जतनालाही हातभार लागतो, असेही त्यांनी नमूद केले.
नैसर्गिक खाद्यसंपदेचे जतन काळाची गरज
नगराध्यक्ष राजन गिरप यांनी रानभाज्यांचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, स्थानिक पातळीवर सहज उपलब्ध होणारी ही नैसर्गिक खाद्यसंपदा जपणे ही काळाची गरज आहे. “रानभाज्या हा आपल्या स्थानिक खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. या परंपरेचे जतन करण्यासाठी आणि पुढील पिढीला तिची ओळख करून देण्यासाठी अशा उपक्रमांना सातत्याने प्रोत्साहन मिळाले पाहिजे,” असे त्यांनी सांगितले.
रानभाज्यांपासून चवींची अनोखी मेजवानी!
स्पर्धेत सहभागी महिलांनी टायकाळी, लाजरी, पेवा, चाईचा मोहर, कर्टुल, लाजाळू, शेवगा आदी रानभाज्यांचा कल्पक वापर करत विविध पदार्थ सादर केले. लाडू, मोदक, सरबत, चटणी, सूप, अप्पे अशा पदार्थांच्या माध्यमातून पारंपरिक रानभाज्यांना आधुनिक पाककलेचा साज चढविण्यात आला. चव, नावीन्य, पौष्टिकता आणि आकर्षक सादरीकरणामुळे स्पर्धेला विशेष रंगत आली.
जाई नाईक यांच्या पाककलेला प्रथम क्रमांकाची मोहोर
या चुरशीच्या स्पर्धेत जाई सुनील नाईक यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यांनी टायकाळ्याचे लाडू, मोदक, सरबत व चटणी हे पदार्थ सादर केले.
द्वितीय क्रमांक : सुश्मिता रामचंद्र गावकर — लाजरीचे मोदक, लाडू व पेव्याचे सूप.
तृतीय क्रमांक : सुजाता गुरुराज साटम — चाईच्या मोहराची जास्वंद.
उत्तेजनार्थ प्रथम : अनुष्का आनंद राणे — मिक्स भाज्यांचे सूप.
उत्तेजनार्थ द्वितीय : जानव्ही तुळशीदास सावंत — कर्टुलाचे अप्पे व लाजाळूची चटणी.
उत्तेजनार्थ तृतीय : मंगेश सुहास माणगावकर — शेवगा-कर्टुलीयुक्त लाडू.
स्पर्धेचे परीक्षण रश्मी राजेश कुडाळकर, डॉ. भारतेंदू भरत भारती आवळे आणि डॉ. बाळकृष्ण गावडे यांनी केले. चव, पाककृतीतील नावीन्य, रानभाज्यांचा प्रभावी वापर, पौष्टिकता आणि सादरीकरण या विविध निकषांवर स्पर्धकांचे परीक्षण करण्यात आले.
परंपरेच्या चवीला आधुनिकतेची फोडणी
रानभाज्यांच्या माध्यमातून स्थानिक खाद्यपरंपरेचे संवर्धन, नैसर्गिक व पौष्टिक आहाराचा प्रसार आणि महिलांच्या पाककला कौशल्याला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम ठरला. कोकणच्या रानावनात सहज उपलब्ध होणाऱ्या रानभाज्यांकडे केवळ पारंपरिक अन्न म्हणून न पाहता त्यातील पोषणमूल्य, स्थानिकता आणि सांस्कृतिक वारसा नव्या पिढीसमोर आणण्याचे काम या उपक्रमातून झाले.
यावेळी व्यासपीठावर इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा ज्योती देसाई, उपाध्यक्षा सई चव्हाण, सेक्रेटरी श्रिया परब, ट्रेझरर वृंदा गवंडळकर, एडिटर आरती गिरप, हिरकणी शहर स्तर संघाच्या अध्यक्षा आकांक्षा परब, उपाध्यक्ष अस्मिना मकानदार, तसेच शिवानी तामणेकर, रसिका राऊळ, राधा बागवे, राजन गावडे, यासीरशहा मकानदार, खेमराज कुबल, अमृत काणेकर, महेश वेंगुर्लेकर, अवधुत नाईक, रामचंद्र शृंगारे, ऋतुजा गावडे, अमोल खानोलकर, प्रथमेश घारे, श्रेयस गावडे, भूषण मांजरेकर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन नगरसेवक प्रशांत आपटे यांनी केले.



