बांदा : “ग्रामीण भागातील शाळांमध्ये आजही शिक्षक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित न राहता विविध उपक्रम राबवितात. मर्यादित साधनसामग्रीतून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या या शिक्षकांच्या कार्याची समाजाने दखल घेणे गरजेचे आहे. ग्रामीण शाळांमधील ही शिक्षणपद्धती आणि शिक्षकांची तळमळ समाजासमोर यावी, यासाठीच जनजागृती सेवा संस्थेने ग्रामीण भागातील शाळांची निवड करून शिक्षक व विद्यार्थ्यांचा सन्मान करण्याचा उपक्रम सुरू केला आहे,” असे प्रतिपादन जनजागृती सेवा संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांनी इन्सुली येथे केले.
जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा इन्सुली नं. ५ पागावाडी येथे जनजागृती सेवा संस्थेतर्फे शिक्षक व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेत विशेष सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांच्या हस्ते शाळेचे मुख्याध्यापक भास्कर रामा माजगावकर, उपशिक्षक सुधीर राजाराम गावडे व हंसराज व्यंकटराव गवळे यांचा सन्मान करण्यात आला.
ग्रामीण भागातील शाळांमध्ये उपलब्ध असलेल्या मर्यादित सुविधा, स्थानिक परिस्थिती आणि विद्यार्थ्यांची विविध शैक्षणिक पार्श्वभूमी यांचा विचार करून शिक्षकांना अध्यापनाच्या विविध पद्धतींचा अवलंब करावा लागतो. अशा परिस्थितीतही विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला चालना देत त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणारे शिक्षक समाजासाठी प्रेरणादायी काम करीत आहेत. याच कार्याची दखल घेऊन संस्थेने इन्सुली नं. ५ पागावाडी शाळेची निवड केली.
‘ग्रामीण शाळा ही केवळ शिक्षणाची नव्हे, तर संस्कारांची केंद्रे’
यावेळी रश्मी मुसळे साळगावकर म्हणाल्या, “ग्रामीण शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पुस्तकातील ज्ञानासोबतच संस्कार, शिस्त, सामाजिक जाणीव आणि स्थानिक संस्कृतीची ओळख दिली जाते. शिक्षक विद्यार्थ्यांशी आत्मीयतेने जोडलेले असतात. त्यामुळे ग्रामीण शाळांमधील शिक्षणपद्धतीचे आणि शिक्षकांच्या योगदानाचे कौतुक होणे आवश्यक आहे. अशा सन्मानातून शिक्षकांना तसेच विद्यार्थ्यांना नवी ऊर्जा मिळते.”
‘सन्मानामुळे कामाची जबाबदारी अधिक वाढते’
मुख्याध्यापक भास्कर माजगावकर यांनी संस्थेचे आभार मानताना सांगितले की, “शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना केवळ परीक्षेपुरते तयार करणे हा आमचा उद्देश नसून त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात. ग्रामीण भागातील शाळेतील शिक्षकांच्या कामाची दखल घेऊन जनजागृती सेवा संस्थेने केलेला हा सन्मान आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. या सन्मानामुळे विद्यार्थ्यांसाठी आणखी चांगले काम करण्याची जबाबदारी वाढली आहे.
उपशिक्षक सुधीर गावडे व हंसराज गवळे यांनीही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्तेची कमतरता नसून योग्य मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि संधी मिळाल्यास ते विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करू शकतात, असे त्यांनी सांगितले.
या सन्मान सोहळ्यास पत्रकार नीलेश मोरजकर तसेच शाळेतील सर्व शिक्षक, पालक विद्यार्थी उपस्थित होते. ग्रामीण भागातील शाळा, शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी जनजागृती सेवा संस्थेने घेतलेला हा उपक्रम कौतुकास्पद असून, ग्रामीण शिक्षणव्यवस्थेतील सकारात्मक काम समाजासमोर आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या माध्यमातून होत असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.



