मिलाग्रिसच्या खेळाडूंची सॉफ्ट टेनिसमध्ये ‘धडाकेबाज’ कामगिरी! ; जिल्हास्तरीय स्पर्धेत तब्बल आठ विद्यार्थ्यांची चमक, विभागीय स्तरासाठी निवड.

सावंतवाडी : मैदानावरची चपळाई, अचूक फटके आणि विजयाची जिद्द यांच्या जोरावर मिलाग्रिस हायस्कूल, सावंतवाडीच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेत दमदार कामगिरी करत शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील लौकिकात आणखी एक मानाचा तुरा रोवला. विशेष म्हणजे विविध वयोगटांत चमकदार कामगिरी करणाऱ्या तब्बल आठ खेळाडूंची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

१४ वर्षांखालील मुलींच्या गटात चेसिया डिसोजा हिने प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपदावर आपले नाव कोरले. याच गटात रेजल गोम्स हिने पाचवा क्रमांक मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली.

१७ वर्षांखालील मुलींच्या गटातही मिलाग्रिसच्या खेळाडूंनी आपला दबदबा कायम राखला. मृणाल कदम हिने प्रथम क्रमांक, तर भार्गवी कानविंदे हिने पाचवा क्रमांक पटकावला.

१४ वर्षांखालील मुलांच्या गटात ग्लेन डिसिल्वा याने चौथा, तर आदिल शेख याने पाचवा क्रमांक मिळवला. १७ वर्षांखालील मुलांच्या गटात मोहित सारंग याने तृतीय क्रमांक, प्रथमेश झेंडे याने चौथा, तर ओंकार चंद्रप्पागोल याने पाचवा क्रमांक पटकावत शाळेच्या यशात भर घातली.

या सर्व खेळाडूंच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली असून, आता विभागीय मैदानावर मिलाग्रिसचे हे शिलेदार आपली विजयी घोडदौड कायम ठेवण्यासाठी सज्ज झाले आहेत.

विद्यार्थ्यांच्या या नेत्रदीपक यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा, शिक्षकवृंद तसेच क्रीडाप्रेमींनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले. विभागीय स्तरावरील आगामी स्पर्धेसाठी त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत, त्यांच्या पुढील यशासाठी विश्वास व्यक्त केला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles