सावंतवाडी : आगामी राजकीय आव्हानांची रणनीती, संघटनात्मक बांधणीला नवी धार आणि कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याच्या निर्धारातून भारतीय जनता पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हा विस्तारित कार्यकारिणी बैठकीचा सावंतवाडीत दिमाखदार शुभारंभ झाला. सावंतवाडी नगर परिषदेच्या बॅरिस्टर नाथ पै सभागृहात झालेल्या या बैठकीला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण आणि राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकासमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या उपस्थितीने विशेष राजकीय वजन प्राप्त झाले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. त्यानंतर दीपप्रज्वलन करून विस्तारित जिल्हा कार्यकारिणी बैठकीचा भव्य शुभारंभ करण्यात आला. राष्ट्रगीत आणि राज्यगीताच्या स्वरांनी सभागृह भारावून गेले, तर त्यानंतर उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये बैठकीबाबत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण, पालकमंत्री ना. नितेश राणे, प्रदेश सरचिटणीस आ. निरंजन डावखरे, आ. योगेश सागर, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, आ. प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, संघटनमंत्री शैलेंद्र दळवी, माजी आमदार अजित गोगटे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

याशिवाय भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष युवराज लखमराजे भोंसले, नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, जिल्हा उपाध्यक्ष महेश सारंग, संदीप गावडे, विशाल परब, जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, तालुका मंडल अध्यक्ष मधुकर देसाई, संतोष राऊळ, शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडिवरेकर, महिला शहराध्यक्षा मोहिनी मडगावकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित देसाई, वेंगुर्ले नगराध्यक्ष राजन गिरप, पंचायत समिती उपसभापती गौरव मुळीक यांच्यासह महेश धुरी, राजू राऊळ, बाळू देसाई, दिलीप भालेकर, संतोष तळवणेकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
संघटन मजबूत करण्याचा निर्धार!
जिल्ह्यातील पक्ष संघटना अधिक सक्षम करणे, आगामी काळातील राजकीय वाटचालीसाठी कार्यकर्त्यांना सज्ज करणे आणि तळागाळापर्यंत पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक भक्कम करण्याच्या दृष्टीने ही विस्तारित कार्यकारिणी बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आहे. वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती आणि जिल्हाभरातून दाखल झालेल्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या उत्साहामुळे सावंतवाडीतील भाजप कार्यालयीन वातावरणाला जणू राजकीय उधाण आले होते.
प्रदेश नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग भाजपची संघटनात्मक वाटचाल अधिक वेगवान करण्याचा निर्धार या बैठकीच्या निमित्ताने अधोरेखित झाला.



