✍️संदीप चव्हाण.
म्हापण : विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बळ मिळावे, शाळेच्या गरजा वेळेवर पूर्ण व्हाव्यात आणि ग्रामीण भागातील शिक्षणव्यवस्थेला हातभार लागावा, या सामाजिक जाणिवेतून उत्साही मित्र मंडळ, म्हापण यांच्याकडून राबविण्यात येणारा शैक्षणिक मदतीचा उपक्रम यंदाही कायम राहिला. दरवर्षीप्रमाणे एस. एल. देसाई विद्यालय, पाट या प्रशालेला मदतीचा हात देताना यावर्षी मंडळाने रोख रकमेऐवजी शाळेच्या मागणीनुसार आवश्यक जादमे उपलब्ध करून सुपूर्द केल्या.
उत्साही मित्र मंडळाकडून दरवर्षी शाळेला १० हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. मात्र, यंदा शाळेला नेमकी कोणती गरज आहे, याचा विचार करून रोख रक्कम देण्याऐवजी आवश्यक असलेल्या जादमे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे मदतीचे स्वरूप केवळ औपचारिक न राहता ती शाळेच्या प्रत्यक्ष गरजेच्या उपयोगी पडली आहे.
‘गरज ओळखा आणि मदत तिथेच पोहोचवा’ या विचारातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे शाळेच्या वतीने कौतुक करण्यात आले. विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा मिळाव्यात, शाळेतील आवश्यक साहित्य व साधनांची कमतरता भासू नये, यासाठी समाजातील संस्था, मंडळे आणि दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.
शिक्षण ही केवळ शाळेची जबाबदारी नसून संपूर्ण समाजाच्या सहभागातून शिक्षणाची वाट अधिक सक्षम होते, याचा प्रत्यय उत्साही मित्र मंडळाच्या या उपक्रमातून आला. दरवर्षी सातत्याने शैक्षणिक क्षेत्रासाठी मदतीचा हात पुढे करणाऱ्या मंडळाच्या या सामाजिक बांधिलकीचे परिसरातून कौतुक होत आहे.
यावेळी उत्साही मित्र मंडळाचे अध्यक्ष गुरुनाथ उर्फ नाथा मडवळ, प्रशालेचे मुख्याध्यापक सयाजी बोंदर, संस्थेचे कार्यवाह विजय ठाकूर, राणे मॅडम, संदिप साळसकर, आर. एन. ठाकूर, नाथा चौधरी आदी उपस्थित होते.



