सावंतवाडी : संकटाच्या काळात माणुसकीचा हात पुढे आला, तर निराशेच्या अंधारातही जीवनाची नवी पहाट उगवू शकते, याचा प्रत्यय सावंतवाडीत आला. सबनीसवाडा येथील रहिवासी आणि शहरातील एका पतसंस्थेत पिग्मी एजंट म्हणून काम करणाऱ्या रुकसाना मुल्ला या गेल्या दोन-तीन दिवसांपासून घराबाहेर दिसत नसल्याने नागरिकांना चिंता वाटू लागली. नागरिकांच्या सतर्कतेमुळे पोलिसांना माहिती मिळाली आणि त्यानंतर सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या ‘जीवनरक्षक अभियाना’ने तत्परतेने धाव घेत एका महिलेला वेळेत वैद्यकीय उपचार मिळवून दिले. प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी दाखविलेली संवेदनशीलता आणि सेवाभाव पुन्हा एकदा अधोरेखित झाला.

रुकसाना मुल्ला या आपल्या फ्लॅटमध्ये एकट्याच राहत असल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी पोलिसांना दिली. दोन-तीन दिवसांपासून त्या दिसत नसल्याने नागरिकांनी पोलिसांना याबाबत कळविले. रात्री सुमारे बाराच्या सुमारास पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घराचा दरवाजा ठोठावून वारंवार आवाज देण्यात आला; मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन दरवाजा उघडण्यात आला. त्यावेळी रुकसाना मुल्ला या बाथरूममध्ये अस्वस्थ अवस्थेत आढळून आल्या. त्या बराच वेळ तेथे पडून असाव्यात, असा अंदाज व्यक्त करण्यात आला.
त्यांना तातडीने बाहेर काढून बेडवर झोपविण्यात आले. मात्र, त्यांची अवस्था अत्यंत अस्वस्थ होती. त्या मोठ्याने आरडाओरड करीत असल्याने उपस्थितांनाही त्यांच्याजवळ जाणे कठीण होत होते. अशा नाजूक परिस्थितीत पोलिसांनी मदतीसाठी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांच्याशी रात्री १२.४५ वाजता संपर्क साधला.
मध्यरात्रीच्या हाकेला तत्काळ प्रतिसाद!
मदतीचा फोन येताच रवी जाधव यांनी क्षणाचाही विलंब न करता प्रतिष्ठानची रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी संस्थेच्या महिला सचिव समीरा खलील, हेलन निब्रे, रूपा मुद्राळे आणि लक्ष्मण कदम यांना तातडीने संपर्क साधून घटनास्थळी बोलावून घेतले. संकटग्रस्त महिलेच्या मदतीसाठी सर्व कार्यकर्ते तत्परतेने एकत्र आले.
रात्री सुमारे दोन वाजता रुकसाना मुल्ला यांना प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेतून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. उपचारांनंतर त्यांना काहीसा आराम मिळाला. त्या वेळी त्यांची मानसिक आणि शारीरिक अवस्था चिंताजनक असल्याने वेळेत रुग्णालयात पोहोचविणे महत्त्वाचे ठरले.
नातेवाईक येईपर्यंत कार्यकर्त्यांची मायेची सोबत!
रुकसाना मुल्ला यांचे नातेवाईक कणकवली येथे राहत असल्याने त्यांना घटनास्थळी पोहोचण्यासाठी वेळ लागला. पहाटे तीन वाजेपर्यंत सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते रुग्णालयात त्यांच्या सोबत थांबून होते. नातेवाईक आल्यानंतरच कार्यकर्त्यांनी रुकसाना यांना त्यांच्या ताब्यात दिले आणि त्यानंतर घरी परतण्याचा निर्णय घेतला.
सध्या रुकसाना मुल्ला यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती आहे. संकटाच्या क्षणी धावून येत वेळेत उपचार मिळवून दिल्याबद्दल त्यांच्या नातेवाईकांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले.
सेवाभावाची ज्योत पुन्हा उजळली!
केवळ रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे एवढ्यापुरतेच नव्हे, तर संकटात सापडलेल्या व्यक्तीला मदत करणे, उपचार मिळेपर्यंत तिच्या सोबत राहणे आणि नातेवाईकांच्या स्वाधीन करेपर्यंत जबाबदारी पार पाडणे, हीच खरी सामाजिक बांधिलकी आहे. सावंतवाडीतील या घटनेतून प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी माणुसकीचे हेच दर्शन घडविले.
या जीवनरक्षक मोहिमेत सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव, समीरा खलील, हेलन निब्रे, रूपा मुद्राळे, लक्ष्मण कदम आणि राहील बाडिवाले यांनी सहकार्य केले.
मध्यरात्री मदतीची हाक आली, कार्यकर्ते धावून आले आणि एका असहाय महिलेच्या मदतीसाठी माणुसकी पुन्हा एकदा जागी झाली! सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या या सेवाकार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.



