‘ऑडिटरच सभेला गैरहजर, मग जाब विचारायचा कुणाला?’ – उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांचा संतप्त सवाल! ; ५७ कोटींच्या नळपाणी योजनेच्या ऑडिटवर प्रश्नचिन्ह,तांत्रिक अहवालावर चर्चेचा फार्स नको!, विशेष सभा पुन्हा घेण्याची मागणी.

सावंतवाडी : सावंतवाडीकरांच्या घशाला पाणी देणारी आणि तब्बल ५७ कोटी रुपयांची गुंतवणूक असलेली नळपाणी योजना आता नव्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. योजनेच्या थर्ड पार्टी ऑडिट रिपोर्टवर चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत तांत्रिक लेखापरीक्षण करणारे तज्ज्ञच अनुपस्थित राहिल्याने सभेच्या उपयुक्ततेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ‘ऑडिटरच सभेला उपस्थित नसतील, तर प्रश्न विचारायचे कुणाला आणि उत्तरं मिळणार कुणाकडून?’ असा थेट सवाल उपस्थित करत सावंतवाडी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर जोरदार आक्षेप नोंदवला आहे.

पुण्यातील सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे मुख्य अन्वेषक तथा स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. नामदेव हेराऊत हे या सभेला उपस्थित नसल्याने नळपाणी योजनेच्या तांत्रिक लेखापरीक्षण अहवालावर सखोल चर्चा कशी होणार, असा सवाल आता ऐरणीवर आला आहे. केवळ सभा घेण्याची औपचारिकता पूर्ण करून इतक्या महत्त्वाच्या विषयाला न्याय मिळणार आहे का, असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होत आहे.

ॲड. निरवडेकर हे या विशेष सभेला ऑनलाइन पद्धतीने उपस्थित होते. मात्र, ऑनलाइन जोडणीतील तांत्रिक अडचणींमुळे सभेतील चर्चा आणि संवाद त्यांना स्पष्टपणे ऐकता येत नव्हता. एका बाजूला तांत्रिक अहवालावर चर्चा करण्यासाठी तज्ज्ञांची अनुपस्थिती, तर दुसऱ्या बाजूला ऑनलाइन सहभागात येणारे अडथळे, अशा परिस्थितीत या महत्त्वपूर्ण विषयावर सविस्तर आणि परिणामकारक चर्चा होणार तरी कशी, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे नळपाणी योजनेच्या थर्ड पार्टी ऑडिट रिपोर्टवर सर्व संबंधितांच्या उपस्थितीत चर्चा करण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभा पुन्हा आयोजित करावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे.

एप्रिलनंतरच्या कामाचे काय?, अहवालाच्या व्याप्तीवरच आक्षेप!

नळपाणी योजनेच्या तांत्रिक लेखापरीक्षण अहवालाबाबत आणखी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करताना ॲड. निरवडेकर यांनी अहवालाच्या कालमर्यादेकडे लक्ष वेधले. त्यांच्या म्हणण्यानुसार, सादर करण्यात आलेला तांत्रिक लेखापरीक्षण अहवाल हा केवळ एप्रिल २०२६ पर्यंत झालेल्या कामावर आधारित आहे. मात्र, या योजनेच्या कामात होत असलेल्या कथित गंभीर अनियमिततांबाबत त्यांनी ९ जुलै रोजीच अधिकृत पत्राद्वारे लक्ष वेधले होते.

त्यामुळे एप्रिलनंतरच्या कालावधीत योजनेच्या कामात नेमके काय घडले, कामाच्या दर्जाबाबत कोणते प्रश्न निर्माण झाले आणि या कालावधीतील बाबींची तपासणी अहवालात झाली आहे का, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत. अहवालाची व्याप्तीच मर्यादित असेल, तर संपूर्ण योजनेच्या कामकाजाचे चित्र स्पष्ट कसे होणार? हा त्यांच्या आक्षेपाचा केंद्रबिंदू आहे.

‘थातूरमातूर चर्चेतून जनतेची दिशाभूल खपवून घेणार नाही!’

सावंतवाडी शहराच्या पाणीपुरवठ्याशी थेट निगडित असलेल्या या कोट्यवधी रुपयांच्या योजनेबाबत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व आवश्यक असल्याचे अधोरेखित करत ॲड. निरवडेकर यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर टीका केली. योजनेत सर्व काही सुरळीत असल्याचे चित्र उभे करून वरवरची चर्चा घडवून आणली जात असेल, तर ते योग्य नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.

“योजनेत सर्व काही अलबेला आहे, अशा पद्धतीने थातूरमातूर सभा घेऊन सावंतवाडीच्या जनतेची दिशाभूल करण्याचा प्रकार चालला असून, तो आम्ही कदापि खपवून घेणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.

पत्रकार परिषदेत पुढील भूमिका स्पष्ट करणार!

५७ कोटींच्या नळपाणी योजनेतील तांत्रिक बाबी, लेखापरीक्षण अहवालाची व्याप्ती आणि कामकाजाबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा होणे गरजेचे असल्याचे ॲड. निरवडेकर यांनी स्पष्ट केले आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत आणि योजनेतील कथित गोंधळाबाबत लवकरच पत्रकार परिषद घेऊन आपली पुढील भूमिका जनतेसमोर मांडणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आता प्रश्न केवळ एका विशेष सभेचा राहिलेला नाही; तर सावंतवाडीकरांच्या पाण्याशी जोडलेल्या ५७ कोटींच्या योजनेतील प्रत्येक महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर मिळणार का, हा आहे! ऑडिट अहवालावर सखोल चर्चा, संबंधित तज्ज्ञांची उपस्थिती आणि उपस्थित आक्षेपांवर स्पष्ट उत्तरे मिळावीत, अशी अपेक्षा या वादाच्या निमित्ताने व्यक्त होत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles