माणगावच्या भातशेतीला बोनसचा ‘हक्काचा घास’ द्या!, प्रोत्साहन अनुदानासाठी शेतकऱ्यांचा तहसीलदारांच्या दारी धडक! ; ॲड. दीपक काणेकर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन.

कुडाळ : माणगाव खोऱ्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांच्या हक्काचा प्रोत्साहन बोनस तातडीने त्यांच्या खात्यावर जमा करावा, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आता प्रशासनाचे दरवाजे ठोठावले आहेत. ॲड. दीपक काणेकर यांच्या नेतृत्वाखाली माणगाव खोऱ्यातील शेतकऱ्यांनी कुडाळ तहसीलदार श्री. सचिन पाटील यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी प्रोत्साहन बोनस रखडल्याने शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेली नाराजी प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आली.

माणगाव खोरे हे भात उत्पादनासाठी प्रसिद्ध असून, येथील असंख्य शेतकरी भातशेतीवर आपला संसाराचा गाडा चालवतात. भात हे केवळ पीक नसून, अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत शेतीचा वाढता उत्पादन खर्च आणि त्या तुलनेत मिळणारे अपुरे उत्पन्न यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

भात लागवडीपासून कापणीपर्यंत मजुरी, बियाणे, खते, कीटकनाशके तसेच अन्य शेती निविष्ठांच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे शासनाकडून दिला जाणारा प्रोत्साहन बोनस हा शेतकऱ्यांसाठी केवळ आर्थिक मदत नसून त्यांच्या मेहनतीला मिळणारे प्रोत्साहन आहे. मात्र, मागील वर्षीचा प्रोत्साहन बोनस अद्याप अनेक पात्र शेतकऱ्यांना मिळालेला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

‘शेतकऱ्याच्या घामाचे मोल वेळेत मिळाले पाहिजे’, अशी भूमिका घेत निवेदनातून प्रोत्साहन बोनस तातडीने वितरित करण्याची मागणी करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भात उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन बोनस अनुदान देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे सांगितले असल्याचा उल्लेखही निवेदनात करण्यात आला.

दरम्यान, तहसीलदार श्री. सचिन पाटील यांनी या मागणीची गांभीर्याने दखल घेतली. संबंधित विभागाशी आवश्यक पत्रव्यवहार करून माणगाव खोऱ्यातील पात्र भात उत्पादक शेतकऱ्यांना शासनाच्या प्रोत्साहन बोनसचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासकीय स्तरावर आवश्यक ते प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले.

भातशेती टिकली तरच कोकणातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळणार असल्याने शेतकऱ्यांच्या हक्काचा प्रोत्साहन बोनस विलंब न लावता तातडीने मिळावा, अशी अपेक्षा माणगाव खोऱ्यातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles