उद्योगांच्या नावाखाली कोकणाची लूट, सामान्य जनतेचा वारंवार होतोय विश्वासघात! ; ‘मातीमाफियांच्या साम्राज्या’समोर प्रशासन हतबल? – ‘सत्यार्थ’ विशेष संपादकीय.

✍️ रूपेश पाटील.

“आपलं कोकण – सह्याद्रीच्या कुशीत विसावलेली निसर्गाची लाल माती, हिरव्यागार डोंगरांची शाल, समुद्राच्या लाटांवर डोलणारी स्वप्ने आणि कष्टाळू माणसांच्या घामाने पिकलेली भूमी!”

पण आज याच कोकणाच्या उरावर विकासाच्या नावाने ओरबाडण्याचा ‘निर्लज्ज खेळ’ सुरू आहे. उद्योग येतील, रोजगार मिळेल, गावांचा कायापालट होईल, अशी गोड स्वप्ने दाखवत उभारण्यात आलेल्या आडाळी एमआयडीसी परिसरात आज उद्योगधंद्यांचा धूर दिसत नाही, मात्र लाल मातीचे ढिग, डंपरची अखंड धावपळ आणि जेसीबीच्या पंज्यांनी फाडलेली धरतीचे विदारक चित्र दिसत आहे.

एकेकाळी ‘उद्योगांची पहाट उगवेल’, असा विश्वास देण्यात आलेल्या जागा आज “मातीखाऊ उद्योगांचे कुरण” बनल्या आहेत. कारखान्यांच्या चिमण्या उभ्या राहण्याआधीच जमिनींची चिरफाड सुरू झाली. कोट्यवधी रुपयांची माती दिवसाढवळ्या बाहेर जात असताना प्रशासन मात्र मौनव्रत धारण करून बसल्यासारखे दिसते. हा विकास आहे की कोकणाच्या अस्तित्वावर चालवलेला बुलडोझर? असा संतप्त सवाल आता प्रत्येक कोकणवासीय विचारू लागला आहे.

रोजगाराच्या नावाखाली युवकांच्या डोळ्यांत स्वप्नांचे इंद्रधनुष्य रंगवले गेले. “उद्योग येतील, हाताला काम मिळेल, स्थलांतर थांबेल,” अशी आश्वासने दिली गेली. पण वास्तव इतके भयावह आहे की, उद्योग उभे राहिले नाहीत; मात्र माती उपशाचे साम्राज्य बोकाळले. रोजगार मिळाला तो काही मोजक्या ठेकेदारांना, डंपर मालकांना आणि मातीमाफियांना! गावातील तरुण आजही मुंबई-पुण्याच्या दिशेने नोकरीच्या शोधात भटकताना दिसतात. ज्यांच्या भवितव्यासाठी एमआयडीसी उभारली गेली, त्यांच्याच भविष्यावर आता लाल मातीचे ढिग पडले आहेत.

कोकणातील डोंगर केवळ दगड-मातीचे नाहीत, ते इथल्या संस्कृतीचे, पर्यावरणाचे आणि अस्तित्वाचे आधारस्तंभ आहेत. पण पैशाच्या हव्यासापोटी या डोंगरांचे पोट फाडले जात आहे. नद्या गाळाने भरत आहेत, भूजल धोक्यात येत आहे, शेती उद्ध्वस्त होत आहे, आणि पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. एका पिढीच्या स्वार्थासाठी पुढच्या अनेक पिढ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा हा प्रकार नाही का?

याहून धक्कादायक बाब म्हणजे स्थानिक नागरिक वारंवार आवाज उठवत आहेत, तक्रारी करत आहेत, पुरावे देत आहेत; मात्र महसूल, प्रदूषण नियंत्रण मंडळ, एमआयडीसी प्रशासन, पोलिस आणि संबंधित यंत्रणा यांची भूमिका संशयास्पद शांततेची दिसते. रात्रीच्या अंधारात सुरू झालेली माती वाहतूक आता उघडपणे दिवसाढवळ्या सुरू आहे. मग प्रश्न असा निर्माण होतो की, या मातीमाफियांना नेमके अभय कुणाचे आहे? कोणाच्या राजकीय वरदहस्तामुळे हे रॅकेट एवढे निर्भय झाले आहे? जनतेच्या डोळ्यांत धूळफेक करून नेमका कुणाचा खिसा भरला जात आहे?

 

कोकणातील सामान्य माणूस उद्योगांना विरोध करत नाही. उलट त्यालाही आपल्या मुलांनी गावातच रोजगार करावा, आपले गाव विकसित व्हावे, अशीच अपेक्षा आहे. पण विकासाच्या नावाखाली जर जमिनींची लूट, पर्यावरणाची हत्या आणि मातीची तस्करीच चालणार असेल, तर हा विकास नसून विनाशाचा महामार्ग आहे. “उद्योग” या पवित्र संकल्पनेलाच काळिमा फासण्याचे काम काही स्वार्थी घटक करत आहेत.

आज गरज आहे ती केवळ चौकशीची नाही, तर कठोर आणि निर्भीड कारवाईची! कोकणातील जनतेच्या संयमाचा अंत पाहू नका. कारण ही लाल माती फक्त जमीन नाही; ती कोकणवासीयांच्या अस्मितेची शपथ आहे. तिची लूट थांबली नाही, तर उद्या जनआक्रोशाचा ज्वालामुखी फुटल्याशिवाय राहणार नाही.

कोकण वाचवायचा असेल, तर “मातीमाफियांचा उद्योग” कायमचा गाडावाच लागेल..! अन्यथा……

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles