ग्रामीण भागातील रस्ते चिखलमय, जिल्हा बांधकाम विभाग सुशेगात! ; पालकमंत्र्यांच्या सुचनांकडे दुर्लक्ष.

कणकवली : पावसाळा पूर्णपणे सुरू होण्यापूर्वीच ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था चव्हाट्यावर आली आहे. पहिल्याच काही अवकाळी पावसांत ग्रामीण भागातील मुख्य रस्त्यांना जोडणारे मार्ग चिखलमय झाले असून, रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. मात्र, या गंभीर परिस्थितीकडे जिल्हा बांधकाम विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधून ‘जिल्हा बांधकाम विभाग सुशेगात’ असल्याचा संतप्त सूर उमटत आहे.

ग्रामीण भागातील अनेक प्रमुख रस्त्यांवर डांबर पूर्णपणे उखडले असून जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी आणि चिखल साचल्याने रस्ता नेमका कुठे आहे, याचा अंदाज वाहनधारकांना येत नाही. विशेषतः दुचाकीस्वारांना या चिखलातून गाड्या काढताना कसरत करावी लागत असून, रोज लहान-मोठे अपघात घडत आहेत. स्वप्नातील गुळगुळीत रस्त्यांचे दावे करणाऱ्या प्रशासनाचे वाभाडे या चिखलमय रस्त्यांनी काढले आहेत.

प्रशासनाच्या उदासिनतेमुळे दरवर्षी पावसाळ्यात ग्रामीण भागातील जनतेला हाच त्रास सहन करावा लागतो. लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागाने तात्काळ जागे होऊन या रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

आता तरी जिल्हा बांधकाम विभाग सुशेगात न राहता या खडेयुक्त आणि चिखलमय रस्त्यांवर ठोस उपाययोजना करणार का? की एखाद्या मोठ्या अपघाताची वाट पाहणार? असा देखील संतप्त सवाल आता जनता विचारत आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जबाबदार लोकप्रतिनिधी आणि प्रशासन आता तरी जागे होते काय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles