सावंतवाडीत रंगला महाराष्ट्राच्या संस्कृतीचा वैभवशाली सोहळा!, ढोल-ताशांच्या निनादात लोकसंस्कृतीचा जागर! ; सावंतवाडीत “असंघटीत लोककलावंत महोत्सवा”ला उत्स्फूर्त प्रतिसाद!, कळसूत्री बाहुल्यांपासून छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकपर्यंत दर्जेदार कार्यक्रमांची मेजवानी!

✍️ प्रा. रुपेश पाटील.

सावंतवाडी :  महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरा, कला आणि संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने “महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा वैभवपूर्ण आनंदोत्सव ”असंघटीत लोककलावंतांचा महोत्सव” या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या तीन दिवसीय सांस्कृतिक महोत्सवात राज्याच्या विविध भागांतून सुमारे १५० लोककलावंत सहभागी होऊन महाराष्ट्राच्या पारंपरिक लोककलांचे सजीव दर्शन घडवत आहेत. लोकसंस्कृतीचा अनमोल ठेवा जपणाऱ्या विविध कलाप्रकारांनी सजलेला हा महोत्सव रसिक प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरत आहे.
या महोत्सवात काल शनिवारी खेळ कळसूत्री बाहुल्यांचा, कोळी नृत्य, मयूर नृत्य, फुगडी आणि झिम्मा, गोंधळ आणि छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक हे कार्यक्रम सादर करण्यात आले असून सर्वच कार्यक्रम दर्जेदार असल्यामुळे प्रेक्षकांना भुरळ घालत आहेत.

      

शनिवारी झालेल्या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी सावंतवाडी येथील ज्येष्ठ मालवणी कवी दादा मडकईकर, ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. ॲड. अरुण पणदूरकर, सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन रेडकर, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, मोहन जाधव, महाराष्ट्र साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य भरत गावडे, आर्यन देसाई यांसह अन्य उपस्थित होते. यावेळी उपस्थिता मान्यवरांचे आणि कलावंतांचे स्वागत करण्यात आले. तसेच प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते सावंतवाडी येथील मिलाग्रीस प्रशालेतील दहावी इयत्तेत शंभर टक्के गुण मिळवणाऱ्या भार्गवी अंकुश शेटवे हिचा सन्मान करण्यात आला. तसेच इन्सुली येथील श्री. व सौ. राणे या दांपत्याचा स्वाध्याय परिवाराचा प्रचार व प्रसार केल्याबद्दल गौरव करण्यात आला.

उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रुपेश पाटील यांनी केले तर सांस्कृतिक कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन सांगली येथील सुप्रसिद्ध निवेदक संतोष जाधव यांनी केले.

दरम्यान या कार्यक्रमाला सावंतवाडीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून आज रविवारी देखील हा महोत्सव हाऊसफुल्ल होणार आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या लोकजीवनातील सांस्कृतिक वैभव, परंपरा आणि कलात्मक विविधतेचे अद्भुत दर्शन घडत आहे.

दरम्यान आज रविवारी कोकणातील पारंपरिक दशावतार, तसेच डोंबारी, भारूड, समई नृत्य, आणि कोळी नृत्य असे कार्यक्रम होणार आहेत.
या सांस्कृतिक सोहळ्यास सर्व कला रसिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लोककलावंतांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन श्रीराम पांडे, संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी केले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles