सावंतवाडी : महाराष्ट्र विधानसभेचे सभापती ॲड . राहुल नार्वेकर मागील काही महिन्यांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांनी सावंतवाडी येथील निवासस्थानी त्यांची सदिच्छा भेट घेत विविध विकासात्मक विषयांवर सविस्तर चर्चा केली. यावेळी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
या भेटीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य सुविधा, तज्ज्ञ डॉक्टरांचे मानधन, पर्यटन विकास, रोजगारनिर्मिती तसेच उद्योगांना करसवलती देण्याची गरज याबाबत निवेदन सादर करण्यात आले. जिल्ह्यातील युवकांना रोजगारासाठी गोवा, मुंबई, पुणे, बंगळुरू येथे जावे लागते. त्यामुळे सिंधुदुर्गमध्ये उद्योग व पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी विशेष सवलती देण्याची मागणी मसूरकर यांनी केली.
तसेच कुडाळ तालुक्यातील माणगाव येथील श्री टेंबे स्वामी महाराज यांच्या कार्यावर आधारित धार्मिक पर्यटन विकसित झाल्यास जिल्ह्यातील व्यापार, हॉटेल व्यवसाय, टॅक्सी व अन्य उद्योगांना मोठी चालना मिळेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
याशिवाय नैसर्गिक आपत्तीग्रस्त नागरिकांसाठी घरपट्टीमधून अल्प विमा कर आकारून शासनाने व्यापक विमा संरक्षण योजना लागू करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
या प्रसंगी युवराज लखनराजे सावंत भोसले, दिलीप भालेकर, प्रतीक बांदेकर, नागेश जगताप, महेश बांदेकर, सुदेश नेवगी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.



