✍️ साबाजी परब.
मुंबई / सावंतवाडी : ऐतिहासिक वारसा, निसर्गसौंदर्य आणि आधुनिकतेचा संगम घडवत सावंतवाडीच्या वैभवात भर टाकणाऱ्या ‘मोती तलाव पुनरुज्जीवन आणि विकास प्रकल्पा’चे भव्य सादरीकरण नुकतेच पार पडले. सावंतवाडीच्या पर्यटन, सांस्कृतिक आणि आर्थिक विकासाला नवी दिशा देणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प महाराष्ट्राचे बंदरे व मत्स्यव्यवसाय विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या विशेष पुढाकारातून आकार घेत आहे.
या महत्त्वपूर्ण बैठकीस सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर, सावंतवाडी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष श्रद्धाराजे सावंत भोसले तसेच युवराज लखमराजे सावंत भोसले उपस्थित होते. शासन आणि सावंतवाडी राजघराण्याच्या एकत्रित प्रयत्नांतून उभा राहत असलेला हा प्रकल्प म्हणजे विकास आणि वारसा जपण्याचा आदर्श नमुना ठरणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
नामांकित ‘थर्टी स्क्वेअर’, ‘आरजेबी-सीपीएल’ (रतन जे. बटलिबोई कन्सल्टंट्स प्रा. लि.) आणि पर्यावरण सल्लागार ‘एज्युकेटेड एन्व्हायर्नमेंट’ यांच्या तांत्रिक सहकार्याने तयार करण्यात आलेला हा आराखडा “लोकांसाठी, जागेसाठी आणि पाण्यासाठी” या संकल्पनेवर आधारित आहे. मोती तलाव हा केवळ जलसाठा नसून सावंतवाडीच्या सांस्कृतिक इतिहासाचा आत्मा असल्याचे अधोरेखित करत त्याच्या संपूर्ण परिसंस्थेच्या पुनरुज्जीवनावर विशेष भर देण्यात आला आहे.
या प्रकल्पाअंतर्गत तलाव परिसरात आकर्षक फूड पार्क, अत्याधुनिक नौकाविहार सुविधा, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी भव्य उत्सव चौक, पारंपरिक घाटांची संकल्पना आणि शांत तलावकाठ विकसित करण्यात येणार आहे. कोकणची समृद्ध लोककला ‘दशावतार नाटक’ तसेच स्थानिक सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी विशेष रंगमंच उभारला जाणार असून, त्यामुळे सावंतवाडी जागतिक पर्यटन नकाशावर अधिक ठळकपणे झळकणार आहे.
मोती तलावाचा हा कायापालट केवळ सौंदर्यीकरणापुरता मर्यादित राहणार नाही, तर स्थानिकांना रोजगार, व्यवसाय आणि पर्यटनातून मोठ्या आर्थिक संधी उपलब्ध करून देणार आहे. पर्यावरणीय संतुलन राखत आधुनिक विकास साधणारा हा प्रकल्प सावंतवाडीच्या भविष्यासाठी ‘गेमचेंजर’ ठरणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.



