शिरूर : श्रद्धा, शेती आणि सेंद्रियतेचा सुंदर संगम अनुभवायला मिळावा अशी प्रेरणादायी कृती शिरूर तालुक्यातील चव्हाणवाडी येथील प्रगतिशील शेतकरी रवी नारायण करगळ यांनी पुन्हा एकदा केली आहे. श्री साईबाबा संस्थानसाठी त्यांनी यावर्षी तब्बल ३५०७ किलो सेंद्रिय केशर आंबा साई चरणी अर्पण करत भक्तिभावाची अनोखी परंपरा कायम राखली आहे.
विशेष म्हणजे, श्री. करगळ हे सलग सातव्या वर्षी श्री साईबाबा संस्थानला आंब्याची देणगी देत असून, त्यांच्या या सेवाभावी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

गेल्या १५ वर्षांपासून ते केशर आंब्याची शेती करत असून त्यांच्या बागेत सुमारे १२५० आंब्याची झाडे आहेत. सुरुवातीपासूनच त्यांनी संपूर्ण बागेत सेंद्रिय शेतीचा अवलंब केला आहे. गावरान गायीच्या शेणापासून तयार होणारे सेंद्रिय खत, जीवामृत आणि नैसर्गिक पद्धतींचा वापर करून त्यांनी दर्जेदार व स्वादिष्ट केशर आंब्याचे उत्पादन घेतले आहे.
रासायनिक खतांऐवजी पूर्णतः नैसर्गिक पद्धतीने उत्पादित केलेल्या या आंब्यांना बाजारात विशेष मागणी असून, पर्यावरणपूरक शेतीचा आदर्शही त्यांनी इतर शेतकऱ्यांसमोर ठेवला आहे.
श्री साईबाबा संस्थानला देणगी स्वरूपात मिळालेल्या या आंब्यांच्या रसाचा समावेश श्री साईप्रसादालयातील प्रसाद भोजनात करण्यात आला असून, हजारो साईभक्तांना या सेंद्रिय आंब्याच्या रसाचा लाभ मिळत आहे.
“शेती ही फक्त व्यवसाय नसून सेवा आणि संस्कार जपण्याचे माध्यम आहे,” हे आपल्या कृतीतून दाखवून देणाऱ्या श्री. रवी करगळ यांच्या कार्याबद्दल परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



