आंबोली : गोवा येथून पुण्याकडे बेकायदेशीररित्या गोवा बनावटीची बिअर वाहतूक करणाऱ्या युवकाविरोधात आंबोली पोलिसांनी दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत स्विफ्ट कारसह एकूण ४ लाख २१ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ज्ञानेश्वर मारुती चिंतोळे (वय २१, रा. रांजणगाव, ता. शिरूर, जि. पुणे, मूळ रा. लोह, जि. नांदेड) असे संबंधित युवकाचे नाव आहे. तो गोवा ते पुणे असा प्रवास मारुती स्विफ्ट गाडी क्रमांक MH 12 JC 5640 मधून करत असताना आंबोली पोलिसांच्या तपासणीदरम्यान संशयित आढळला.
पोलीसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये गोवा बनावटीच्या बिअरच्या टीनची बेकायदेशीर वाहतूक सुरू असल्याचे उघड झाले. जप्त करण्यात आलेल्या बिअरची किंमत २१ हजार ३६० रुपये असल्याचे सांगण्यात आले.
ही कारवाई २८ मे २०२६ रोजी रात्री उशिरा आंबोली चेकपोस्ट येथे करण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक सरदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संतोष गलोले, मनीष शिंदे, रामदास जाधव, श्री. काळे, श्री. परब तसेच होमगार्ड श्री. जंगले व श्री. बरगडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
या प्रकरणी संबंधित युवकाविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास आंबोली पोलीस करत आहेत.



