✍️ रुपेश पाटील.
वाचक मित्रहो, आजच्या राजकारणाच्या बदलत्या प्रवाहात अनेक चेहरे बदलतात, विचार बदलतात, निष्ठा बदलतात; पण काही माणसं अशी असतात जी कोणत्याही वादळात स्वतःची भूमिका, विचार आणि इमान डळमळू देत नाहीत. अशाच निष्ठावान, जिद्दी आणि जनसामान्यांच्या हक्कासाठी सदैव झटणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचं नाव म्हणजे रुपेश राऊळ.
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख म्हणून कार्यरत असलेले रुपेश राऊळ हे केवळ राजकीय पद धारण करणारे नेते नाहीत, तर ते जनतेच्या सुख-दुःखाशी नाळ जुळलेला एक संवेदनशील चेहरा आहेत. संघर्षाच्या अत्यंत कठीण काळातही स्वतःचे इमान आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांप्रती असलेली निष्ठा त्यांनी अखंड जपली. सत्तेच्या मोहापायी अनेकांनी मार्ग बदलले, पक्ष बदलले; मात्र रुपेश राऊळ यांनी शिवसेनेच्या मूळ विचारांशी कधीही तडजोड केली नाही.

नेमळे सारख्या ग्रामीण भागात असो किंवा सावंतवाडी तालुक्यातील कोणत्याही भागातील नागरिकांवर संकट कोसळलं की मदतीसाठी सर्वप्रथम धावून जाणारं नाव म्हणजे रुपेश राऊळ. एखाद्या गरीब कुटुंबाला आधार देणं, अन्यायग्रस्तांच्या पाठीशी उभं राहणं, कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी सोडवणं किंवा सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणं, हे त्यांच्यासाठी केवळ राजकारण नाही तर समाजसेवेचं व्रत आहे.
त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक वेगळी दिलदारी आणि जिंदादिली आहे. कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याचं नातं, प्रत्येक माणसाला आपलंसं वाटेल असा स्वभाव आणि कोणत्याही परिस्थितीत खंबीरपणे उभं राहण्याची ताकद यामुळे ते जनसामान्यांचा हक्काचा माणूस बनले आहेत. आजच्या स्वार्थी राजकारणात जमिनीवर राहून काम करणारा नेता दुर्मिळ झाला आहे; पण रुपेश राऊळ यांनी ही ओळख कायम ठेवली आहे.
नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला, तरी त्यांनी निराशेच्या गर्तेत स्वतःला हरवून दिलं नाही. उलट पराभवानंतर दुसऱ्याच दिवशी नव्या जोमाने जनतेच्या सेवेसाठी स्वतःला झोकून दिलं. कारण त्यांच्यासाठी निवडणूक ही केवळ राजकीय लढाई नसून समाजाशी असलेली बांधिलकी अधिक महत्त्वाची आहे.

आजही त्यांच्या सोबत ठाकरे सेनेचे कट्टर शिवसैनिक खंबीरपणे उभे आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी आणि जनसामान्याभिमुख विचारधारेवर श्रद्धा ठेवून रुपेश राऊळ हे आपल्या सहकाऱ्यांसह सामान्य माणसाच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरतात. गरीबातील गरीब व्यक्तीलाही “हा आपला माणूस आहे” असा विश्वास वाटावा, अशी त्यांची कार्यशैली आहे.


अशा या संघर्षशील, निष्ठावान आणि जनतेसाठी अहोरात्र झिजणाऱ्या दिलदार व्यक्तिमत्त्वाचा आज वाढदिवस… त्यानिमित्त आई भवानी त्यांना उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य आणि जनसेवेची अखंड ताकद देवो, हीच मनःपूर्वक प्रार्थना.

रुपेश राऊळ म्हणजे केवळ एक राजकीय नेता नव्हे, तर संघर्षातून घडलेला खरा शिवसैनिक… जनतेच्या मनात घर करणारा आणि विश्वासाच्या पायावर उभा असलेला एक खंबीर चेहरा!
स्व. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारा, लढवय्या नेता आणि जनसामान्याचा हक्काचा माणूस असणाऱ्या रुपेश राऊळ यांना वाढदिवसाच्या हृदयपूर्वक हार्दिक शुभेच्छा!



