एकही घर वगळले जाणार नाही याची दक्षता घ्या! ; जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडून जनगणना २०२७ च्या कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी.

नागरिकांनाही केले सहकार्याचे आवाहन.

सिंधुदुर्गनगरी : जनगणना २०२७ अंतर्गत सुरू असलेल्या टप्पा- १ मधील घरगणना व घरयादी तयार करण्याच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथील देऊळवाडी परिसराला भेट देऊन प्रत्यक्ष क्षेत्रीय पाहणी केली. या भेटीदरम्यान त्यांनी जनगणना प्रक्रियेतील विविध बाबींची सखोल माहिती घेत कामकाजाची गुणवत्ता आणि अचूकता तपासली.

देऊळवाडी येथील रुपाली कृष्णा मसुरकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी प्रत्यक्ष घरगणना प्रक्रियेचे निरीक्षण केले. यावेळी प्रगणक व पर्यवेक्षक यांनी त्यांच्या उपस्थितीत संबंधित कुटुंबाची घरगणना पूर्ण केली. घरगणना करताना विचारण्यात येणारे प्रश्न, माहिती नोंदविण्याची पद्धत आणि डिजिटल माध्यमातून माहिती संकलनाची प्रक्रिया याविषयी त्यांनी माहिती घेतली.

यानंतर जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी जनगणना पर्यवेक्षक आणि प्रगणकांशी संवाद साधून प्रत्यक्ष कामकाजादरम्यान येणाऱ्या अडचणी, नागरिकांचा प्रतिसाद तसेच माहिती संकलनातील आव्हाने याबाबत चर्चा केली. जनगणना ही देशाच्या विकास नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असल्याने प्रत्येक घराची अचूक आणि संपूर्ण नोंद होणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

यावेळी त्यांनी कोणतेही घर नजरचुकीने वगळले जाणार नाही याची विशेष दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या. प्रगणक आणि पर्यवेक्षक यांच्या कार्यास ग्रामपंचायत प्रशासनाचे प्रभावी सहकार्य मिळवून प्रत्येक घराची नोंद अचूकपणे होईल याची खात्री करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. तसेच, एखाद्या घराची घरगणना झाली नसल्याचे आढळल्यास ग्रामीण भागातील नागरिकांनी स्थानिक तलाठी कार्यालयाशी, तर शहरी भागातील नागरिकांनी संबंधित नगरपालिका प्रशासनाशी संपर्क साधून ही बाब निदर्शनास आणून द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

सदर क्षेत्रीय भेटीदरम्यान उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुशे, तहसीलदार सचिन पाटील, निवासी नायब तहसीलदार अमरसिंह जाधव, मंडळ अधिकारी प्रशांत मसुरकर, पोलिस पाटील वैभव धुरी तसेच देऊळवाडी गावातील इतर प्रगणक उपस्थित होते.

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या या प्रत्यक्ष क्षेत्रीय पाहणीमुळे जनगणना 2027 अंतर्गत सुरू असलेले घरगणना व घरयादी तयार करण्याचे काम अधिक अचूक, पारदर्शक आणि सर्वसमावेशक पद्धतीने पूर्ण होण्यास मदत होणार आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles