सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गातील सहकारी चळवळ अधिक सक्षम, गतिमान आणि परिणामकारक करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळाला प्रशिक्षण व विविध विकासात्मक उपक्रमांसाठी अधिक सहकार्य केले जाईल. सहकार क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी जिल्हा बँक नेहमीच मंडळाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, अशी ग्वाही सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिली.
सिंधुनगरी, ओरोस येथील सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळाच्या नूतन कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष तथा सहकार महर्षी शिवरामभाऊ जाधव यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधत या नूतन कार्यालयाचे उद्घाटन मनीष दळवी यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळाचे अध्यक्ष गजानन सावंत, उपाध्यक्ष सुभाष तळवडेकर, संचालक विलासराव ऐनापुरे, विनोद मर्गज, जिल्हा बँकेचे संचालक विद्याप्रसाद बांदेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, सहकार विकास अधिकारी मंगेश पांचाळ तसेच बँकेचे अधिकारी, पदाधिकारी आणि सहकार क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष गजानन सावंत यांनी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सिंधुनगरी येथे सुसज्ज व प्रशस्त कार्यालय उपलब्ध करून दिल्याबद्दल अध्यक्ष मनीष दळवी यांचे विशेष आभार मानले. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्र राज्य सहकारी संघ, पुणे यांच्या अंतर्गत कार्यरत असलेले सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळ संपूर्ण जिल्ह्यात सहकारी शिक्षण, प्रशिक्षण, प्रचार आणि प्रसिद्धीचे महत्त्वपूर्ण कार्य सातत्याने करत आहे.
सहकार महर्षी शिवरामभाऊ जाधव यांनी जिल्ह्यात सहकारी चळवळीच्या विस्तारासाठी आणि बळकटीसाठी दिलेले योगदान अविस्मरणीय आहे. त्यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या उद्घाटन सोहळ्याने सहकार क्षेत्रातील नव्या वाटचालीला दिशा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
सहकार, शिक्षण आणि प्रशिक्षण यांची सांगड घालत जिल्ह्यातील सहकारी संस्थांना सक्षम बनविण्याच्या दृष्टीने हे नूतन कार्यालय महत्त्वाची भूमिका बजावणार असून, जिल्ह्यातील सहकारी चळवळीला यामुळे नवे बळ मिळणार आहे.



