‘गोकृपा अमृत’ शेतीसाठी वरदान! ; असनिये व तांबोळी येथे शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन.

सावंतवाडी : नैसर्गिक व सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी तसेच रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करण्याच्या उद्देशाने सावंतवाडी तालुक्यातील असनिये आणि तांबोळी येथे ‘गोकृपा अमृत’ विषयक मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी मिलिंद निकम यांनी शेतकऱ्यांना ‘गोकृपा अमृत’चे महत्त्व, त्याचे फायदे, निर्मिती प्रक्रिया आणि वापर पद्धती याबाबत सविस्तर माहिती दिली.

परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी या कार्यक्रमास उपस्थित होते. मार्गदर्शन करताना श्री. निकम यांनी सांगितले की, ‘गोकृपा अमृत’ हे संपूर्णपणे नैसर्गिक आणि सेंद्रिय जीवाणूजल असून जमिनीची सुपीकता वाढविणे, पिकांची वाढ सुधारणे आणि उत्पादनक्षमतेत भर घालणे यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते. गुजरातमधील बन्सी गीर गोशाळेचे गोपाळभाई सुतारिया यांनी दीर्घ संशोधनातून या संकल्पनेची निर्मिती केली आहे. विशेष म्हणजे, हे विरजण शेतकऱ्यांना मोफत उपलब्ध करून दिले जाते आणि एका लिटर मूळ विरजणापासून शेतकरी स्वतःच्या घरी कोट्यवधी लिटर गोकृपा अमृत तयार करू शकतात.

यावेळी त्यांनी गोकृपा अमृताच्या विविध फायद्यांवर प्रकाश टाकला. जमिनीतील उपयुक्त जीवाणूंची संख्या वाढल्याने जमिनीचा पोत सुधारतो, कडकपणा कमी होऊन जमीन भुसभुशीत बनते. तसेच हवेतील नत्र स्थिर करण्यास, जमिनीतील स्फुरद व पालाश उपलब्ध करून देण्यास मदत होते. यामुळे पिकांच्या मुळांची वाढ चांगली होते आणि उत्पादनात लक्षणीय वाढ होते.

पिकांची रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठीदेखील गोकृपा अमृत उपयुक्त ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले. त्याच्या नियमित वापरामुळे बुरशीजन्य रोगांचा आणि किडींचा प्रादुर्भाव कमी होतो. शिवाय जमिनीतील सुप्त अवस्थेतील स्थानिक गांडुळे पुन्हा सक्रिय होऊन जमिनीचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.

कार्यक्रमात उपस्थित शेतकऱ्यांना २०० लिटर गोकृपा अमृत तयार करण्याची सोपी पद्धतही समजावून सांगण्यात आली. तसेच पाणी व्यवस्थापन, ठिबक सिंचन, फवारणी आणि नियमित वापराबाबत आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या शेवटी शेतकऱ्यांनी विविध प्रश्न उपस्थित करून शंका निरसन करून घेतले. नैसर्गिक शेतीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी असे मार्गदर्शन उपयुक्त व प्रेरणादायी ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles