कुडाळ : पंचायत समितीच्या मासिक सभांमध्ये विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित राहून लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या प्रश्नांवर चर्चा करतात. मात्र महसूल विभाग अधिकृतरित्या या सभांमध्ये सहभागी होत नसल्याने महसूल विषयक अनेक प्रश्न, तक्रारी आणि लोकहिताचे मुद्दे प्रलंबित राहतात. ही गंभीर बाब कुडाळ पंचायत समिती गटनेते तथा माणगाव पंचायत समिती सदस्य योगेश धुरी यांनी राज्याचे महसूल विभागाचे अप्पर सचिव विकास खारगे यांच्या निदर्शनास आणून दिली.
यावेळी श्री. धुरी यांनी पंचायत समितीच्या मासिक सभेत महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची अधिकृत उपस्थिती अनिवार्य करण्यात यावी, अशी ठाम मागणी केली. महसूल विभाग सभेत उपस्थित राहिल्यास शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आणि लोकप्रतिनिधींना महसूलविषयक अडचणी, तक्रारी व सूचना थेट मांडण्याची संधी मिळेल. त्यामुळे अनेक प्रश्नांवर तत्काळ चर्चा होऊन त्यांची जलद सोडवणूक होण्यास मदत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
महसूल विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील समन्वय अधिक प्रभावी करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरेल, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
दरम्यान, श्री. धुरी यांच्या मागणीची दखल घेत अप्पर सचिव विकास खारगे यांनी सकारात्मक भूमिका घेतली. या विषयाचा सखोल अभ्यास करून महसूल विभागाच्या सहभागाबाबत कायदेशीर व प्रशासकीय पातळीवर काय करता येईल, याचा विचार करण्यात येईल तसेच लवकरच याबाबत योग्य निर्णयाची माहिती दिली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
महसूल विभागाच्या सहभागामुळे पंचायत समिती सभांना अधिक परिणामकारकता प्राप्त होऊन नागरिकांच्या प्रश्नांना त्वरित न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.



