जनसेवेचा ध्यास, समाजहिताचा श्वास! – भाजपा राज्य युवा नेते विशाल परब यांचा लोकाभिमुख प्रवास! – विशेष संपादकीय.

✍️ रूपेश पाटील ✍️

सावंतवाडी : राजकारणात अनेक चेहरे निवडणुकीच्या मोसमात अचानक जनतेसमोर अवतरतात, आश्वासनांची आतषबाजी करतात आणि निवडणूक संपताच पुन्हा अदृश्य होतात. मात्र काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात की त्यांना समाजसेवेसाठी कोणत्याही निवडणुकीची, पदाची किंवा प्रसिद्धीची गरज नसते. जनतेच्या सुख-दुःखाशी नाळ जोडून निरपेक्ष भावनेने कार्य करणाऱ्या अशाच व्यक्तिमत्त्वांपैकी एक नाव म्हणजे भारतीय जनता पार्टीचे युवा नेते विशाल प्रभाकर परब.

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात गेल्या अनेक वर्षांपासून विशाल परब यांच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, क्रीडा आणि विविध जनहिताच्या क्षेत्रांत सातत्याने उपक्रम राबविले जात आहेत. संकटात सापडलेल्या कुटुंबांना आधार देण्यापासून ते विद्यार्थ्यांना प्रोत्साहन, युवकांना संधी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी प्रशासनाच्या दारात ठामपणे उभे राहण्यापर्यंत त्यांच्या कार्याचा व्याप मोठा आहे.

 

आजच्या काळात समाजकारणापेक्षा स्वार्थकारणाला अधिक महत्त्व दिले जात असताना, कोणतीही अपेक्षा न ठेवता जनतेच्या सेवेसाठी स्वतःला वाहून घेणारे कार्यकर्ते फारच दुर्मिळ झाले आहेत. विशाल परब यांनी मात्र जनसेवा हेच आपले ध्येय मानत लोकांच्या मनात विश्वासाचे अढळ स्थान निर्माण केले आहे. अनेकांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचे, संकटग्रस्तांना मदतीचा हात देण्याचे आणि निराश मनांना नव्या आशेचा किरण दाखविण्याचे काम त्यांनी सातत्याने केले आहे.

आता पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी आणि विशाल परब यांच्या माध्यमातून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात मोफत छत्री वाटप उपक्रम राबविण्यात येत आहे. हा केवळ छत्री वाटपाचा कार्यक्रम नसून गरजू आणि वंचित घटकांप्रती असलेल्या सामाजिक बांधिलकीचा जिवंत पुरावा आहे. पावसाच्या सरींपासून संरक्षण देणारी ही छत्री अनेकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलविणार आहे.

“जनसेवा हीच ईश्वरसेवा” या विचाराला कृतीची जोड देत समाजहिताचा वसा जपणाऱ्या विशाल परब यांचे कार्य आज अनेक युवकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. प्रसिद्धीच्या झोतात राहण्यापेक्षा लोकांच्या मनात स्थान मिळविण्यावर विश्वास ठेवणाऱ्या या युवा नेतृत्वाने समाजकारणाला नवी दिशा दिली आहे.

सत्ता असो वा नसो, पद असो वा नसो… जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र झटणाऱ्या, समाजहिताचा ध्यास घेतलेल्या आणि माणुसकीचे नाते जपणाऱ्या या सच्च्या समाजसेवकाला मानाचा मुजरा!

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles