✍️ रूपेश पाटील ✍️
कणकवली : सिंधुदुर्गच्या राजकारणात आणि विकासाच्या वाटचालीत महत्त्वपूर्ण ठरणारी पालकमंत्री ना. नितेश राणे यांची भव्य पत्रकार परिषद आज कणकवली येथील प्रहार भवनात काही क्षणांत पार पडणार असून या परिषदेकडे केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्याचेच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.
“१२ वर्षे विश्वासाची, विकासाची आणि जनकल्याणाची” या संकल्पनेवर आधारित होणाऱ्या या पत्रकार परिषदेत गेल्या बारा वर्षांतील विकासकामांचा आढावा, जनतेसाठी राबविण्यात आलेल्या विविध योजनांचा लेखाजोखा तसेच आगामी काळातील विकासाचे व्हिजन मांडले जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पायाभूत सुविधा, पर्यटन, मत्स्यव्यवसाय, बंदर विकास, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार निर्मिती यांसारख्या विविध क्षेत्रांत झालेल्या कामांचा तपशील यावेळी मांडला जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे विकासाच्या मुद्द्यांवर सिंधुदुर्गला राज्यात “रोल मॉडेल जिल्हा” म्हणून उभे करण्याचा आराखडाही यावेळी समोर येऊ शकतो.
राज्यातील बदलत्या राजकीय घडामोडी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाहूल आणि जिल्ह्यातील आगामी राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर या पत्रकार परिषदेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे पालकमंत्री नितेश राणे कोणते नवे संकेत देणार, विरोधकांवर काय भाष्य करणार आणि विकासाच्या पुढील टप्प्यांसाठी कोणत्या घोषणा करणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
गेल्या बारा वर्षांत जनतेने दाखविलेल्या विश्वासाच्या बळावर विकासाचा वेग कायम ठेवत सिंधुदुर्गला प्रगतीच्या नव्या उंचीवर नेण्याचा संकल्प या पत्रकार परिषदेतून व्यक्त होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
“विश्वासाच्या भक्कम पायावर विकासाचा भव्य महाल अन् पालक मंत्री नितेश राणेंचाच्या पत्रकार परिषदेतून उलगडणार सिंधुदुर्गच्या भविष्यातील नवा आराखडा!”, चर्चेला उधाण आले आहे.



